|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अनुराग ठाकूर यांनी मागितली बिनशर्त माफी

अनुराग ठाकूर यांनी मागितली बिनशर्त माफी 

 नवी दिल्ली/ वृत्तसंस्था :

न्यायालयात शपथेवर चुकीचे वक्तव्य देणे आणि न्यायालयीन अवमानाप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. न्यायालयात यावरून ठाकूर यांच्याकडून माफीपत्र सादर करण्यात आले. याप्रकरणी न्यायालय शुक्रवारी सुनावणी करेल.

आपल्या एक पानी प्रतिज्ञापत्रात ठाकूर यांनी काही चुकीची माहिती आणि गैरसमजुतीमुळे हा प्रकार घडला असून आपण कोणत्याही अटीशिवाय स्पष्ट शब्दांमध्ये माफी मागतो, न्यायालयाची प्रतिष्ठा कधीच कमी लेखली नाही असे नमूद केले. न्यायालयाने 7 जुलै रोजी ठाकूर यांना बिनर्शत माफी मागण्याचा आदेश दिला होता.

ठाकूर यांच्याकडून अगोदर जे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले, त्यावर न्यायालय विचार करणार नाही. 14 जुलै रोजी न्यायालयासमोर हजर राहावे असे न्यायाधीश दीपक मिश्रा आणि ए.एम खानविलकर, डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले होते. माफीपत्र स्वीकारून अवमानाची कारवाई बंद केली जाऊ शकते असा संकेत न्यायालयाने दिला होता. तर ठाकूर यांचे वकील पी.एस. पटवालिया यांनी अशील माफीपत्र देण्यास तयार असल्याचे सांगितले होते.

क्रिकेट सुधारासाठी स्थापन लोढा समितीच्या शिफारसींना लागून करण्याप्रकरणी सुनावणीदरम्यान न्यायालयाने शपथेवर चुकीची माहिती देण्यासाठी ठाकूर यांच्याविरोधात कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. न्यायालयीन आदेशाच्या पालनात ठाकूर यांनी अडथळा आणला, आदेशाचे पालन करवू शकत नसल्याचे ठाकूर यांनी म्हणत आपल्या कर्तव्य नाकारले असे खंडपीठाने म्हटले हेते.