|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » देवानेच त्याला परत आणले…

देवानेच त्याला परत आणले… 

बेपत्ता उमेश नाईक घरी परतला जबर जखमी असल्याने हॉस्पिसियोत उपचार

प्रतिनिधी/ कुडचडे-मडगाव

जम्मू व काश्मिर येथे वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेला व गुढरित्या बेपत्ता झालेला देवळेमळ-कुडचडे येथील व्यावसायिक उमेश नाईक (53) हा काल बुधवारी गोव्यात परतला तो जखमी अवस्थेतच. त्याच्या हाता-पायाला अनेक जखमा झाल्या आहेत. या जखमा कशा झाल्या हे अद्याप स्पष्ट व्हायचे बाकी आहे. गेले तीन दिवस उपाशी असल्याने त्याची परिस्थिती नाजूक बनली असून त्याला उपचारासाठी मडगावच्या हॉस्पियिसो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

मडगावातील एजंट अजित कारापूरकर यांच्या सहाय्याने उमेश नाईक व अन्य तेराजण वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर 9 जुलैपासून उमेश नाईक गुढरित्या बेपत्ता झाला होता. गेले दहा दिवस तो गायब होता.

बिकट अवस्थेत पोहोचला कुडचडय़ात

काल बुधवारी संध्याकाळी अंत्यत बिकट अवस्थेत तो कुडचडे रेल्वे स्थानकावर उतरला. त्यावेळी एका पायलटने त्याला ओळखले व घरी नेऊन सोडले. यावेळी त्याच्या कुटुंबियांच्या डोळय़ात आनंदाश्रू उभे राहिले. ‘देवानेच त्याला परत आणले’ असे उद्गार त्यावेळी सर्वांच्या तोंडून निघाले. सर्वांनीच देवाचे आभार मानले. पण, उमेशची नाजूक परिस्थिती पाहून सर्वानाच जबरदस्त धक्का बसला. त्याला घरच्या लोकांनी त्वरित कुडचडे आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी हॉस्पिसियोत नेण्यात आले.

गोव्यापर्यंतचा प्रवास अत्यंत वेदनादायक

सद्या उमेशची परिस्थिती नाजूक असल्याने, त्याच्याकडून अधिक माहिती प्राप्त करणे शक्य झालेले नाही. पण, कुडचडेहून 108 रूग्णवाहिकेतून मडगावात आणले जात असताना, त्याने पत्नीशी संवाद साधला. त्याप्रमाणे गेले तीन दिवस आपण उपाशी आहे. पोटात अन्नाचा कण व पाण्याचा थेंबही नाही. जम्मू काश्मिर ते गोवापर्यतचा प्रवास अतिशय वेदनादायक होता. पायात चप्पल नाही, अंगात एक शर्ट सोडल्यास धड कपडे नाही, कंबरेला एक लुंगी. पोलिसांनी केलेली थोडी मदत तसेच खर्चासाठी कुणी तरी दिलेले थोडे पैसे, यावर आपण गोव्यात पोचल्याचे त्याने सांगितलेय.

आणखी एक दिवस गेला असता तर…

आणखी एक दिवस याच अवस्थेत गेला असता तर आपण या जगाचा कायमचा निरोप घेतला असता, असे त्याने पत्नीला सांगितले. तीन दिवस उपाशी असल्याने, उमेशला धड बोलता येत नाही. कुडचडे आरोग्य केंद्रात नेऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतरच त्याने बायकोशी किंचित संवाद साधला.

मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात दाखल केल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. संपूर्ण अंगावर जखमा असल्याने डॉक्टरांनी विनाबिलंब उपचार हातात घेतले. यावेळी त्याला खूप खोकला येत होता. त्याचा एक्स-रे काढण्याबरोबरच इतर चाचण्या देखील घेतल्या जात होत्या. उमेश नाईक हा मधुमेहाचा रूग्ण असल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण देखील तपासण्यात आले.

उमेशला एवढय़ा जखमा कशा काय झाल्या हाच खरा संशोधनाचा भाग बनला आहे. जोपर्यंत उमेशच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही, तोवर त्याच्याकडून अधिक माहिती मिळणे कठीण होऊन बसले आहे. अंगावरील जखमा पहाता, त्याला कुणी तरी मारहाण केली असावी तसेच आपला जीव वाचविण्यासाठी त्याने काटय़ाखुटय़ातून मार्ग काढला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

कुडचडेत पायलटने ओळखले

काल बुधवारी संध्याकाळी 4 वा. कुडचडेत येणाऱया हावडा एक्सप्रेस रेलगाडीने उमेश कुडचडेत दाखल झाला. त्यावेळी सुरवातीला त्याला कोणीच ओळखले नाही. पण, मोटारसायकल पायलट शंकर नाईक याने त्याला ओळखले व त्याची गंभीर अवस्था पाहून त्याला आधार देऊन देवळेमळ येथे घरी घेऊन गेला व नंतर त्याच्या नातेवाईकाना सांगून त्यास कुडचडेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

9 जुलै रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कटरा येथून उमेश बेपत्ता झाल्याने व त्याच्या बरोबर वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेले यात्रे करू परत आल्याने उमेशच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. बेपत्ता उमेशचा शोध लावण्यासाठी मागिल चार दिवसापुर्वी त्याचे काही नातेवाईक कटरा येथे गेले होते. त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकावर तक्रार देखील नोंद केली होती. पण, बेपत्ता उमेशचा शोधण्यासाठी गेलेले, त्याचे नातेवाईक तिकडे असतानाच उमेश जखमी अवस्थेत गोव्यात परतल्याने सर्वांनाच सुखद धक्का बसला. केवळ देवानेच त्याला परत आणले असे उद्गार त्याची पत्नी तसेच बहिणी व इतर नातेवाईकांनी काढले.

उमेशची प्रकृती ठिक झाल्यावर त्याच्याकडून उपलब्ध होणाऱया माहितीनंतरच त्याचे गुढरित्या बेपत्ता होणे व नंतर जखमी अवस्थेत गोव्यात पोहचणे यावर अधिक प्रकाश पडणार आहे.

Related posts: