|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » संरक्षण राज्यमंत्री भामरे यांची सियाचिनला भेट

संरक्षण राज्यमंत्री भामरे यांची सियाचिनला भेट 

सीमेवरील चौक्यांची केली पाहणी, सैनिकांशी साधला संवाद

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जगातील सर्वात उंच रणभूमी मानल्या गेलेल्या सियाचिनला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी भेट दिली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी लडाख आणि पश्चिम लडाखमधील भारतीय सेनेच्या चौक्यांचीही पाहणी केली. 15 आणि 16 जुलै असे दोन दिवस त्यांचा हा दौरा होता. या दौऱयात त्यांनी सीमेवर दक्ष असणाऱया सैनिकांशीही संवाद साधला.

यावेळी भामरे यांच्यासमवेत लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नू व राज्यसभा खासदार संभाजी शाहू छत्रपती इत्यादी मान्यवर होते. सियाचीन रणभूमी समुद्रसपाटीपासून 17 हजार फूट इतक्या उंचीवर असून तेथे भारताने आपल्या सैन्याचा तळ निर्माण केला आहे. उणे 40 डिग्री सेंटीग्रेड इतक्या कडाक्याच्या थंडीत तेथे सैनिक अहोरात्र जागता पाहरा ठेवून शत्रूंच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत करतात. भामरे यांना या दौऱयात अधिकाऱयांनी येथील परिस्थितीची कल्पना दिली.

सैनिकांचे हितरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन भामरे यांनी सैनिकांशी बोलताना केले. देशातील जनता सैन्याबद्दल नितांत आदर आणि अभिमान बाळगते. सरकारही सैनिकांच्या सर्व मुद्दय़ांचे निराकरण करण्यास सज्ज आहे. सियाचिन सारख्या अत्यंत दुर्गम आणि कष्टप्रद ठिकाणी वास्तव्य करून देशाचे संरक्षण करणाऱया सैनिकांबद्दल आम्हाला गर्व आहे. सैनिकांच्या या अतुलनीय धैर्यामुळेच देश सुरक्षित आहे, असे उद्गार त्यांनी याप्रसंगी काढले.

नंतर त्यांनी लडाखच्या जिल्हा कार्यालयालाही भेट दिली. तसेच स्थानिक कलाकारांनी सादर  केलेले सांस्कृतिक कार्यक्रमही पाहिले. त्यांनी या दौऱयात तोलोलिंग, टायगर हिल, बात्रा शिखरालाही भेट दिली. देशविरोधी आणि हिसंक शक्तींना देश अस्थिर करावयाचा असून सेनेचे मनोधैर्य खचविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र देशाचे शूर सैनिक या प्रयत्नांना भीक न घालता आपले कर्तव्य पार पाडत आहेत, अशी भलावण त्यानी केली.       

पुरस्कार वितरण

भामरे यांच्या हस्ते येथील अनेक महत्वाच्या व्यक्तींचा ‘कारगिल पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिक जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमातही भामरे यांनी स्थानिक प्रशासन आणि सेना करीत असलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे कौतुक केले.

Related posts: