|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » काणकोणात यंदाही ‘डोंगरी मिरची’ची मोठय़ा प्रमाणात लागवड

काणकोणात यंदाही ‘डोंगरी मिरची’ची मोठय़ा प्रमाणात लागवड 

प्रतिनिधी/ काणकोण

 

संपूर्ण गोव्यात प्रसिद्ध असलेल्या काणकोणच्या डोंगरी मिरचीची लागवड यंदा देखील मोठय़ा प्रमाणात करण्यात आली आहे. डोंगराच्या उतरणीवरील जमीन भाजून घेऊन त्या ठिकाणी मिरचीच्या रोपांची लागवड केली जाते. त्याआधी रोपे तयार केली जातात आणि रोपांची लागवड केल्यानंतर दहा किंवा पंधरा दिवसानी त्या रोपांना ‘सावळ’ घालावी लागते, अशी माहिती गुळे येथील भिकरो गावकर यांनी दिली.

या तालुक्यातील गावडोंगरी, गुळे, खोतीगाव भागांमध्ये मिरचीचे पीक घेण्यात येत आहे. मिरचीच्या लागवडीबरोबरच मोठय़ा प्रमाणात हल्ली दोडकी, भेंडी, चिबूड, काकडी यांचीही लागवड केली जात असून करमलघाट, गुळे, आगोंद, खोल त्याचप्रमाणे राष्ट्रीय हमरस्त्याच्या बाजूला छोटे-छोटे मंडप उभारून गावठी भाज्यांची विक्री करण्याचे प्रस्थ हल्ली मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. या व्यवहारांतून लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसत आहे.

हिरव्या मिरचीची उलाढाल

याच्या जोडीलाच गावडोंगरी, खोतीगाव या भागांमध्ये हिरव्या मिरचीची लागवड सध्या चालू आहे. माजी कृषीमंत्री रमेश तवडकर यांच्या प्रयत्नांतून वरील भागांमध्ये ‘कलेक्टिव्ह फार्मर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ तीन वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. एकाच वेळी अशा दोन सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. या संस्थांचे जवळजवळ 800 सदस्य आहेत, तर त्यात 38 ते 40 स्वयंसाहाय्य गट सामील झाले आहेत. दोन्ही संस्थांची सरकार दरबारी नोंदणी झालेली आहे. एडा येथे संस्थेचे कार्यालय आहे.

2015-16 या आर्थिक वर्षात या दोन्ही संस्थांनी 17 टन इतक्या मिरचीची निर्यात अन्य ठिकाणी केली होती, अशी माहिती या संस्थांचे मुख्य प्रवर्तक उल्हास पै भाटीकर यांनी दिली. या दोन्ही संस्थांना टाटा कंपनी तसेच गोवा शिपयार्डने आर्थिक सहकार्य केले आहे. विशेषता फलोत्पादन महामंडळामार्फत या मिरचीची खरेदी करून निर्यात करण्यात आल्याचे भाटीकर यांनी सांगितले. या दोन्ही संस्थांमार्फत खोतीगाव, गावडोंगरी भागांमध्ये 40 विहिरी खोदण्यात आल्या असून त्यावर पंप बसविण्यात आलेत तसेच जलवाहिनी टाकण्यात आली आहे.

हिरव्या मिरचीला आवश्यक भाव नाही

या भागांतील 80 टक्के आदिवासी समाज या संस्थांचा सदस्य असून तयार झालेल्या मिरचीला मात्र हवा तेवढा भाव मिळत नसल्याचे मत भाटीकर यांनी व्यक्त केले. सुरुवातीला किलोमागे रु. 30 इतकाच भाव मिळत असतो, असे त्यांनी सांगितले. डोंगरी मिरचीचा भाव मात्र दरवर्षी वाढत असतो. मागच्या वर्षी 300 ते 400 रु. किलो दराने डोंगरी मिरची विकली गेली.

कृषी खात्याने मिरचीच्या ‘निशा’ जातीची बियाणे वितरित केली असून मागच्या वर्षी ‘जी-4’ हे नवे बियाण शेतकऱयांना देण्यात आले. या जातीचे एक रोपटे 8 ते 10 किलो मिरची देते. दरवर्षी त्या झाडाची छाटणी केल्यास ते अधिक काळ टिकते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षी समाधानकारक पीक आले नाही. या मिरचीला सेंद्रिय खत घालण्यासाठी वरील दोन्ही सहकारी संस्थांनी मोठय़ा प्रमाणात गांडूळ खत या ठिकाणी तयार केले.

मोठय़ा प्रमाणात पीक घेतल्यास फायदा

डोंगरी मिरची लाल असते आणि तिची पूड देखील लालच बनते. मात्र निशा किंवा अन्य जातीच्या मिरच्या वाळवल्या, तर सुरुवातीला त्या लाल दिसतात. मात्र त्या मिरचीची पूड बनविल्यास ती सफेद बनते. त्यामुळे या मिरच्या वाळवून खाण्यापेक्षा हिरव्याच जेवणात वापरल्या जातात. या मिरचीचे पीक सामूहिकरीत्या आणि मोठय़ा प्रमाणात घेतल्यास नक्कीच फायदा मिळू शकतो, असे भाटीकर यांनी स्पष्ट केले. सदर दोन्ही संस्थांकडे साधनसामग्री आहे. कार्यालय असले, तरी कार्यालयाची जबाबदारी सांभाळणारे कर्मचारी हवेत. त्यासाठी अशा प्रकारच्या आदिवासी समाज प्रामुख्याने समाविष्ट असलेल्या संस्थांना सरकारने आर्थिक सहकार्य करण्याची गरज आहे. आदिवासी कल्याणमंत्री गोविंद गावडे यांची नुकतीच भेट घेऊन याविषयी त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, अशी माहिती भाटीकर यांनी दिली.

खर्च व दराचा ताळमेळ जुळत नाही

सध्या खोतीगावात एक प्रगतशील शेतकरी प्रसाद वेळीप यांनी मोठय़ा प्रमाणात ‘निशा’ आणि ‘जी-4’ या जातीच्या मिरचींची लागवड केली आहे. या मिरचीला फलोत्पादन महामंडळ किलोमागे 30 ते 42 रुपये इतकाच दर देते. त्यामुळे खर्च व दराचा ताळमेळ जुळत नाही, असे मत वेळीप यांनी व्यक्त केले. वेळीप हे कृषीशास्त्रातील पदवीधारक व प्रशिक्षित असे शेतकरी आहेत. गोवा सरकारने मागच्या वर्षी त्यांचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरव केला होता.

कृषीखाते हवी तेवढी मदत व सहकार्य करत असते. मात्र या ठिकाणी कामगार मिळत नाहीत. बऱयाच वेळा पिकाची नासाडी होण्याच्या घटना घडतात. कमी खर्चात अधिक पीक घेण्यात येत असले, तरी नवीन शेतकरी या व्यवसायाकडे वळत नसल्याचे चित्र हल्ली दिसायला लागले आहे. वेळीप यांनी मिरचीबरोबरच मोठय़ा प्रमाणात भेंडीची लागवड केली आहे. दोन वर्षांपूर्वी सहकारी संस्थांनी मिरचीच्या पिकाकडे ज्या पद्धतीने लक्ष दिले होते तेवढे हल्ली दिले जात नाही. मिरचीपेक्षा अन्य भाज्यांचे पीक घेण्याकडे अधिक कल दिसत आहे. तरी देखील या तालुक्यात पिकविण्यात येणाऱया डेंगरी मिरची आणि हिरव्या मिरचीला संपूर्ण गोव्यातून मागणी येत असल्याची माहिती कृषी व्यवसायाकडे वळलेल्या संजय कोमरपंत यांनी दिली.