|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बढाई हो बढाई

बढाई हो बढाई 

वेळोवेळी मला (मागितल्यावर किंवा अनाहूत) सल्ला देणारे एक ज्ये÷-निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांना मी ‘सर’ म्हणतो.

एकदा सरांचा फोन आला, “तुझ्याकडे एका लेखकाला पाठवतोय. लेखक माझ्या वयाचे आहेत. उत्तम लिहितात. मात्र अद्याप लोकांना ठाऊक झालेले नाहीत. नुकतीच त्यांची कादंबरी प्रकाशित झाली आहे.’’

“आता त्यात मी काय करू?’’

“ती कादंबरी तुफान खपली पाहिजे.’’

“मी एक प्रत विकत घेतो. माझ्या ओळखीची काही वाचनालये आहेत. कादंबरी विकत घेण्यासाठी त्यांना विनंती करतो.’’

“ते तर तू करशीलच. त्याखेरीज आणखीन काही कर. त्यांच्या कादंबरीवर छान स्तुतीपर परीक्षण लिहून एखाद्या दैनिकात ते छापून आण. शिवाय फेसबुकवर एक लेख लिहून तुझ्या सर्व मित्रांना ती कादंबरी विकत घेण्यासाठी आवाहन कर.’’

मला पुढे काही बोलू न देता त्यांनी फोन बंद केला. त्याच दिवशी कलत्या संध्याकाळी लेखक आले. रेशमी कुर्ता, सलवार, टक्कल, तुंदिलतनू, वाढलेली दाढी. दाढीला मेंदी लावलेली होती आणि तिच्या मुळांजवळचा भाग पांढरा दिसत होता. ते आले आणि खुर्चीत ऐसपैस बसले. मी चहा विचारला. त्याला नकार देत त्यांनी खिशातून पुडीचा सरंजाम काढला आणि तंबाखू चोळत स्वत:ची ओळख करून दिली. त्यानुसार ते एकेकाळी गाजलेले पटकथाकार, सहाय्यक दिग्दर्शक वगैरे वगैरे होते. कोणत्याही शूटिंगला गेल्यावर  नट-नटय़ा आज त्यांना वाकून नमस्कार करतात. त्यांच्या कादंबरीच्या पाचशेहून अधिक प्रती सर्व नट-नटय़ा-छायाचित्रकार, दिग्दर्शक वगैरे बडय़ा मंडळींनी विकत घेतल्या आहेत. अनेकजण त्यावर चित्रपट किंवा दूरदर्शन मालिका काढण्यासाठी उत्सुक आहेत. पुढच्या वषी एका विद्यापीठात ही कादंबरी पाठय़पुस्तक म्हणून लागणार आहे. मी ऐकून अवाक झालो. ते पुढे म्हणाले की त्यांच्या घराचं इंटेरियर डेकोरेशन चालू आहे. तेव्हा मी त्यांच्याकडून पाचशे प्रती घ्याव्यात आणि विकाव्यात. पैशांची घाई नाही. या प्रस्तावावर मी माझी असमर्थता दर्शवली. त्यांनी माझी कीव केली आणि निघून गेले. सर प्रत्यक्ष भेटले तेव्हा म्हणाले की लेखकांनी घरातले दागिने मोडून स्वत:च्या खर्चाने कादंबरी छापली आहे. स्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यांचा स्वाभिमान न दुखावता त्यांना मदत केली पाहिजे. पण हे कसं करावं हे समजत नाही.

मी सरांना दुजोरा दिला.

Related posts: