|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ड्रगनला थप्पड

ड्रगनला थप्पड 

भारत-चीन दरम्यानचा तणाव दिवसेंदिवस वाढत असून या दोन्ही राष्ट्रांच्या सीमावादात अमेरिकेच्या पँटागॉनने चीनला फारशी मदत करण्याचे टाळल्याने ड्रगनचा अपेक्षाभंग साहजिकच अपेक्षित आहे. चीनबरोबरचे युद्ध आपल्याला परवडणार नाही हे भारताला माहीत आहे. परंतु सिक्कीममधील डोकलामवर आपला ताबा घेऊ पाहणाऱया ड्रगनला त्याची जागा दाखविण्याची संधीही भारताला  सोडायची नाही. केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्रीr सुषमा स्वराज यांनी परवा संसदेत केलेल्या निवेदनावर चीन प्रुद्ध झालेला आहे. चीनमधील वृत्तपत्रे सध्या भारतावर तुटून पडत आहेत. भारताला चीनशी युद्ध पुकारायचे नाही. परंतु गेल्या 4/5 वर्षांत चीनने अगोदर अरुणाचल प्रदेशामध्ये काही प्रमाणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. आता सिक्कीममध्येही हाच प्रकार तो करू पहात आहे. चीनच्या सीमेवर असलेल्या तिबेटवर चीनने दावा केलेला आहे. आता भूतान या एका छोटय़ा राष्ट्रावरही चीन दबाव आणू पाहत आहे. चीनने मोठय़ा प्रमाणात भारतीय सरहद्दीनजीक अलिकडेच केलेल्या युद्धसरावामुळे भारत काही गप्प राहणार नाही. 1962 मध्ये भारत चीन दरम्यान जे युद्ध झाले. त्यातून दोन्हीही राष्ट्रांचे नुकसान झाले आणि दोन्ही राष्ट्रांदरम्यान युद्धविराम समझोता झाला होता. आता चीन हे अधिक प्रगत राष्ट्र बनलेले आहे व या राष्ट्राला युद्धाची खुमखुमी आहे. भारताशी युद्ध करण्यासाठी हे बलाढय़ राष्ट्र गेली काही वर्षे पाकिस्तानशी मैत्री साधून आहे. पाकिस्तानमध्ये एक विशाल आंतरराष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे काम सध्या चीन करीत आहे. पाकिस्तानला चीन म्हणजे काय आहे याची कदाचित कल्पना नसेल. केवळ भारताचा शत्रू म्हणून त्याने चीनशी मैत्री केलेली आहे.ड्रगन मोठय़ा प्रमाणात पाकिस्तानमध्ये विविध क्षेत्रांत गुंतवणूक करीत आहे. पाकिस्तानमधून मोठय़ा प्रमाणात जे दहशतवादी काश्मिरमध्ये घुसवून दररोज काश्मिरमध्ये हल्ले चढविण्याचे जे काम पाकिस्तान करीत आहे त्याला चीनची साथ मिळत आहे. मात्र पाकिस्तान वगळला तर चीनच्या मदतीला अन्य कोणती राष्ट्रे येणार नाही. चीनने मोठय़ा प्रमाणात आधुनिक शस्त्रसामग्री तयार केली आहे. आणि त्याद्वारेच ड्रगन सध्या गुरगुरतोय. मात्र भारताने अंतर्गत जी तयारी केली आहे त्यावर भारत काही बोलून दाखवत नाही. चीनच्या गुरगुरण्याला भारत घाबरत नाही. त्यामुळेच भारताने एकाच वेळी दोन ठिकाणाहून होणाऱया संभाव्य हल्ल्यासाठी तयारी केली आहे. चीनने हल्ला चढविल्यानंतर भारताचे सैनिक त्यात गुंतलेले असतील हे पाहून पाकिस्तान आपल्या दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याचा प्रयत्न करील. त्यामुळे आपल्याला एकाच वेळी या शेजारील दोन राष्ट्रांशी मुकाबला करावा लागणार आहे. भारताने आपली युद्धसामग्री तयार ठेवलेली आहे. तथापि शुक्रवारी कॅगने आपल्या ताज्या अहवालात भारताकडे केवळ 10 ते 15 दिवस युद्ध करण्याइतपतच युद्धसाठा असल्याचा अहवाल सादर केलेला आहे. त्यावर सरकारने मौन पाळलेले आहे. भारताला सध्या जगातील सर्वांत मोठय़ा व बलाढय़ देशांकडून मिळणाऱया पाठिंब्यामुळे चीनला भारतावर युद्ध लादताना शेकडो वेळा विचार करावा लागेल.  भारताशी युद्ध हे चीनला परवडणार नाही. दरवर्षी चीनचा मोठय़ा प्रमाणात व्यापार हा भारतात होतो. सुषमा स्वराज यांनी संसदेत केलेल्या वक्तव्यानंतर चीनी वृत्तपत्रांनी 1 इंच जमीनदेखील भारताला देणार नाही असा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च संरक्षण विभागाने चीनला या कामी सहकार्य करण्याऐवजी भारत व चीनला आपसातील चर्चेद्वारे सीमाप्रश्न सोडवा. अमेरिका त्यात हस्तक्षेप करणार नाही, असा सल्लाच देऊन चीनला गारद केलेले आहे. दोन्ही राष्ट्रांमधील तणाव तसा अनाकलनीय आहे. चीन गरजेपेक्षा भारतात हस्तक्षेप करू पहात आहे. भारताच्या बऱयाचशा भागावर ड्रगनची वक्रदृष्टी आहे. मात्र या दोन्ही राष्ट्रांतील तणावामुळे जरी डोकेदुखी वाढली असली तरी भारत अद्याप शांत आहे. 1962 मधील भारत व आज 2017 मधील भारत यात प्रचंड फरक आहे. भारताला दुबळा ठरवू पाहणाऱया चीनला सत्यस्थितीचा विसर झालेला आहे. त्यामुळे सध्या सीमेवर तणाव निर्माण करून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न चीन सध्या करीत आहे. मात्र प्रत्यक्ष हल्ला करण्याचा धीरही त्याला होत नाही. तसे केल्यास आंतरराष्ट्रीय नियमांचे चीनकडून सरळ सरळ उल्लंघन होईल. त्यामुळे सीमेवर दादागिरी करून भारतीय सैन्याला त्रास देण्याचे सत्र चीनी सैनिकांनी आरंभले जात आहे. पँटागॉनने चीन आणि भारताला आंतरराष्ट्रीय सीमाप्रश्न आपसात बसून सोडविण्याचा दिलेला सल्ला हे खरे तर चीनला दिलेले सणसणीत उत्तर आहे. पाकिस्तान वगळता चीन प्रत्येक शेजारील राष्ट्राबरोबर आपल्या सीमाप्रश्न बळाचा वापर करीत आहे. सिक्कीममध्ये चीनने गेला महिनाभर जो बळाचा वापर करण्यासाठी ज्या हालचाली चालविल्या आहेत. भारत त्या रोखून धरीत आहे. भारताला सध्या तरी चीनशी युद्ध करण्याची खुमखुमी नाही. मात्र चीनची आशिया खंडातील दादागिरी निपटून काढावयाची असल्यास भारताला अन्य काही राष्ट्रांशी या संदर्भात चर्चा करावी लागणार. चीनची दादागिरी आता कोणी खपवून घेणार नाही. पँटागॉनने जेव्हा हात झटकले त्यावेळीच ते स्पष्ट झालेले आहे. 1962 मध्ये भारत-चीन युद्धात भारताचा पराभव झालेला होता. त्याची वारंवार चीन याद करून देत आहे व भारत आजही त्याच स्थितीतील आहे. असा चीनचा गैरसमज आहे. 55 वर्षांनंतर चीन भारताला जो धसका लागलेला आहे त्याची अनेक वेगळी कारणे असावीत. भारतीय अर्थव्यवस्था कमालीची सुधारतेय, हेच चीनचे खरे दुःख आहे. पाकिस्तानपर्यंत चीनने जो आंतरराष्ट्रीय इकॉनामीक कॉरीडॉट स्थापन केला आहे. त्यातून चीन पाकिस्तानला गिळंकृत करील हे पाकिस्तानला समजणारही नाही. परंतु भारत महाशक्ती बनणार याच भीतीने चीनला ग्रासलेले आहे. त्यातून चीनला युद्धाची खुमखुमी आलेली आहे. पँटागॉनने शनिवारी जो इशारा चीनला दिलेला आहे ती खरे तर चीनसाठी एक सणसणीत चपराकच आहे.

Related posts: