|Sunday, March 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » सागरी सामरिक क्षमता वृद्धीसाठी भारताचे पाऊल

सागरी सामरिक क्षमता वृद्धीसाठी भारताचे पाऊल 

प्रोजेक्ट-75 : 70 हजार कोटी रुपयांच्या खर्चाची योजना : 6 देशांचे घेतले जाणार सहकार्य

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

 भारताने अखेर आपली सागरी सामरिक क्षमता वाढविण्याची कवायत गतिमान केली आहे. भारताने 6 देशांसोबत (फ्रान्स, जर्मनी, रशिया, स्वीडन, स्पेन आणि जपान) मिळून समुद्राच्या आत सुरक्षेसाठी सर्वात मोठय़ा व्यवहारासाठी पुढाकार घेतला आहे. या  व्यवहारांतर्गत भारतात 70 हजार कोटींच्या खर्चाने 3 अत्याधुनिक स्टेल्थ पाणबुडय़ा निर्माण केल्या जातील.

भारताच्या या संरक्षण कार्यक्रमाला ‘प्रोजेक्ट-75’ नाव देण्यात आले असून केंद्र सरकारने पहिल्यांदा नोव्हेंबर 2007 मध्ये याची ‘आवश्यकता मान्य’ केली होती. त्यावेळी देशात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संपुआचे सरकार सत्तेवर होते. आता 10 वर्षांनंतर हा व्यवहार पुढे सरकत असून यंदा मे महिन्यात संरक्षण मंत्रालयाने याला अंतिम मंजुरी दिली.

विदेशी कंपन्यांचे सहकार्य

भारत सरकारने मागील आठवडय़ात पाणबुडीची निर्मिती करणाऱया 6 कंपन्या डीसीएनएस (फ्रान्स), थायसेनप्रुफ मॅरिन सिस्टीम (जर्मनी), रोजोबोरोनएक्सपोर्ट रुबीन डिझाइन ब्यूरो (रशिया), नवानतिया (स्पेन), साब (स्वीडन) आणि मित्सुबिशी-कावासाकी हेवी इंडस्ट्रीज कम्बाइन (जपान)ला ‘रिक्वेस्ट ऑफ इन्फॉर्मेशन’ पाठविली आहे. ज्यात या कंपन्यांना 15 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याची विनंती करण्यात आली.

7-8 वर्षांनंतरच पहिली पाणबुडी

या कंपन्यांकडून आरएफआयचे उत्तर मिळाल्यावर या सर्व कंपन्यांना आरएफपी (रिक्वेस्ट फॉर प्रपोजल) जारी करण्याअगोदर प्रस्ताव नेव्हल स्टाफ क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंटकडे पाठविला जाईल. या विदेशी सहकाऱयांसोबत चर्चेदरम्यान रणनीतिक करारासाठी भारतीय शिपयार्डची निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेला जवळपास 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो. व्यवहारावर सर्व बाजूंचे शिक्कामोर्तब होताच 7-8 वर्षांनंतर पहिली पाणबुडी सज्ज होईल.

आत्यंतिक गरज

प्रकल्पांतर्गत भारतीय नौदल अगोदर 6 डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडय़ांची निर्मिती करू इच्छिते, ज्यात जमिनीवर हल्ला करू शकणारे क्रूज क्षेपणास्त्र, एअर-इंडिपेंडेंट प्रोपल्सन, पाण्याच्या आत अधिक वेळ राहण्याची क्षमता आणि सेंसरसारख्या सुविधा असतील. प्रोजेक्ट-75 अंतर्गत 18 डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडय़ा, 6 आण्विक हल्ल्यास सक्षम पाणबुडय़ा आणि 4 अणुऊर्जेने संचालित पाणबुडय़ा मिळणार आहेत. नौदल सध्या केवळ 13 जुन्या पारंपरिक पाणबुडय़ांसह कार्यरत आहे. त्यातील निम्म्याच कोणत्याही क्षणी मोहिमेत वापरास सक्षम आहेत. आयएनएस अरिहंत आणि आयएनएस चक्र वगळता उर्वरित पाणबुडय़ांचे वयोमान 10 ते 25 वर्षांदरम्यान आहे.

अन्य देशांचे सामर्थ्य

@चीन : 5 आण्विक आणि 51 डिझेल-इलेक्ट्रिक ऊर्जेने संचालित होणाऱया पाणबुडय़ा ड्रगनच्या नौदलात आहेत. याशिवाय 5 आधुनिक जेएन शेणीच्या आण्विक पाणबुडय़ा ज्यावर 7400 किलोमीटरपर्यंत मारा करणारे जेएल-2 क्षेपणास्त्रs तैनात असतील, त्या लवकरच सामील होईल.

@पाकिस्तान : भारताच्या या शेजारी देशाकडे 5 इलेक्ट्रिक-डिझेल ऊर्जेवर कार्यान्वित होणाऱया पाणबुडय़ा आहेत. पाकने आणखी 8 पाणबुडय़ांच्या खरेदीचा करार चीनसोबत केला आहे.

@महत्त्वाचे देश : जागतिक महासत्ता असणाऱया अमेरिकेच्या नौदलाजवळ आण्विक ऊर्जायुक्त 72 पाणबुडय़ा आहेत. रशियाकडे देखील या शेणीतील 40 हून अधिक, ब्रिटनजवळ 8 आणि फ्रान्सकडे 12 आण्विक पाणबुडय़ा आहेत.

Related posts: