|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘स्वदेश दर्शन’मध्ये सिंधुदुर्गची किनारपट्टी

‘स्वदेश दर्शन’मध्ये सिंधुदुर्गची किनारपट्टी 

सावंतवाडी : केंद्राच्या पर्यटन मंत्रालयाकडून स्वदेश दर्शन योजनेंतर्गत सिंधुदुर्गच्या कोस्टल सर्किटची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी 82 कोटी 17 लाख रुपयांच्या प्रस्तावांना केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. योजनेंतर्गत आतापर्यंत 12 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. स्वदेश दर्शन योजनेंतर्गत जिल्हय़ातील किनारपट्टी भागातील पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे.

योजनेंतर्गत देशातील विविध राज्यांतील किनारपट्टी भागातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपये, तर गोव्यासाठी 99 कोटी 99 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गसाठी आलेल्या निधीचा आकडा पाहता येत्या दोन वर्षांत जिल्हय़ातील पर्यटनात आमुलाग्र बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील देवगड, मालवण आणि वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टी भागातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येणार आहे. या अंतर्गत तरंगते कॉटेज, पर्यटन माहिती केंद्रे, प्रसाधनगृह, समुद्रकिनाऱयांचे सौंदर्यीकरण, पदपथे बांधणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. योजनेंतर्गत विजयदुर्गसाठी 16 कोटी 21 लाख रुपये मंजूर झाले आहेत. निधीतून तरंगते कॉटेज, पर्यटन माहिती केंद्र, प्रसाधनगृह, समुद्र किनाऱयाचे सौंदर्यीकृत पदीपन करणे, अस्तित्वातील जेटीत सुधारणा करणे, हाऊसबोट ठेवणे, तरंगती जेटी, पडेल कॅन्टीन येथे रस्त्यालगत सोयीसुविधा निर्माण करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. देवगडसाठी सहा कोटी 48 लाख रुपये मंजूर झाले असून या अंतर्गत निरीक्षक टॉवर उभारणे, उपहारगृह, जेटीमध्ये सुधारणा, पर्यटन माहिती केंद्र आणि तंबू निवास उभारण्याचे काम या निधीतून करण्यात येणार आहे. मिठबाव येथे 6 कोटी 17 लाख रुपयांच्या निधीतून प्रसाधनगृह, पदपथ, समुद्रकिनाऱयाचे सौंदर्यीकरण, गजिबो, निरीक्षक टॉवर व आपत्कालीन बचाव यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मालवण तालुक्यातील तारकर्लीसाठी 10 कोटी 23 लाख, तर तोंडवलीसाठी 12 कोटी 68 लाख रुपये मंजूर झालेल्या निधीतून मिठबावप्रमाणेच कामे करण्यात येणार आहेत. तोंडवलीत इंडोनेशियन कॉटेज, पर्यटन माहिती केंद्र, तंबू निवास ही जादा कामे करण्यात येणार आहेत.

वेंगुर्ले तालुक्यात निवती किल्ल्यावर प्रसाधनगृहासाठी 22 लाख रुपये, तर शिरोडय़ासाठी 9 कोटी 75 लाख, सागरेश्वरसाठी 8 कोटी 79 लाख, तर मोचेमाडसाठी 6 कोटी 53 लाख रुपये स्वदेश दर्शन योजनेंतर्गत मंजूर झाले आहेत. या ठिकाणीही इंडोनेशियन कॉटेज, प्रसाधनगृह, पदपथ, निरीक्षक टॉवर, गजिबो, पर्यटन माहिती केंद्र तसेच विविध पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.

स्वदेश दर्शन योजनेंतर्गत किनारपट्टी भागातील पर्यटनस्थळांचा विकास करणे हे केंद्राचे धोरण आहे. या अंतर्गत देशी-विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याबरोबर स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती हा उद्देश आहे. मंजूर झालेल्या निधीतून पर्यटन विकासाची कामे झाल्यास किनारपट्टी भागातील पर्यटनात आमुलाग्र बदल होणार आहे.