|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सरसकट कर्जमाफी द्या!

सरसकट कर्जमाफी द्या! 

बांदा : मडुरा पंचक्रोशीतील शेतकऱयांनी सरसकट कर्जमाफीसाठी मडुरा मंडळ अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. आंदोलनाबाबत आगामी नोटीस देऊनही मंडळ अधिकारी एम. व्ही. पडवे यांनी अनभिज्ञता दर्शविली. दरम्यान, सायंकाळी उशिरा जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रीतेश राऊळ, सावंतवाडीचे सभापती रवी मडगावकर, सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजू परब यांनी शुक्रवारी 28 जुलैला जि. प. अध्यक्षा रेश्मा सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधण्याची ग्वाही दिल्यानंतर शेतकऱयांनी आंदोलन स्थगित केले. महसूल विभागाच्या अधिकाऱयांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने शेतकऱयांनी नाराजी व्यक्त केली.

बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासून शेतकऱयांनी मडुरा येथील मंडळ अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला प्रारंभ केला. काहीवेळाने तेथे दाखल झालेल्या मंडळ अधिकारी पडवे यांनी आंदोलनाबाबत अनभिज्ञता दर्शविली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आंदोलनाबाबत आठवडय़ापूर्वी मंडळ अधिकारी, तहसीलदार व जिल्हाधिकाऱयांना नोटिसा दिल्या होत्या. असे असतानाही पडवे यांनी नियोजित आंदोलनाबाबत आपणाला काहीच माहीत नसल्याचे सांगत आंदोलन करण्यास मज्जाव केला. हा आपल्या अखत्यारितील विषय नसून जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात जाऊन उपोषण छेडण्याची सूचना शेतकऱयांना केली. मात्र, शेतकऱयांनी आक्रमक भूमिका घेत आपले उपोषण नियोजित असल्याचे सांगितले. सायंकाळपर्यंत कोणीही अधिकारी अथवा पदाधिकाऱयांनी आंदोलनस्थळी भेट दिली नव्हती. सायंकाळी उशिरा जि. प. शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ, सभापती मडगावकर व संजू परब यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. यावेळी शेतकऱयांनी 2016-17 जूनची येणे कर्जे सरसकट माफ करण्याची मागणी केली. शुक्रवार 28 जुलैला जि. प. अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱयांचे लक्ष वेधण्याची ग्वाही पदाधिकाऱयांनी दिल्यानंतर शेतकऱयांनी आंदोलन स्थगित केले. उपोषणस्थळी मंडळ अधिकाऱयांव्यतिरिक्त महसूलच्या एकाही अधिकाऱयाने भेट न दिल्याने शेतकऱयांनी यावेळी महसूल यंत्रणेचा निषेध केला.

यावेळी सुरेश गावडे, प्रकाश वालावलकर, ज्ञानेश परब, आत्माराम गावडे, यशवंत कुबल, सुकाजी मोरजकर, समीर परब, विजय चौकेकर, एस. डी. नाईक, नारायण परब, बाबली परब, बाबू गावडे, सोमनाथ परब, बाळू राणे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Related posts: