|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नागजंपीचे शंका निरसन

नागजंपीचे शंका निरसन 

“विचार की. तुझ्या सगळय़ा प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करीन, फक्त एकच अट आहे, नाग्या. आजच्या नाश्त्याचं बिल तू दे. बरेच दिवस तू बिल दिलं नाहीस. या निमित्तानं खाऊनपिऊन झाल्यावर तुझा हात स्वतःच्या खिशाकडे वळेल.’’

नाग्याने कुरकुरत होकार दिला आणि माझ्या अंगावर पहिला प्रश्न फेकला, “ते बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का दिलं असेल रे?’’

त्याचा प्रश्न ऐकून मी वेटरला मसाला डोशाची ऑर्डर दिली आणि नाग्याला प्रतिप्रश्न केला, “तुला सुरेश भट हे नाव ऐकून माहिती असेल ना,  नाग्या?’’

“होय की. त्यांचं एक कविता माझ्या बायकोला खूप आवडतंय. मालवून टाक दीप…’’

“या वयात देखील?’’

“म्हणजे काय? चाळीस वर्षांपूर्वी मी तिला बघायला गेलं तेव्हा मला पोहे दिल्यावर तिनं हेच गाणं म्हटलं की. पण  सुरेश भटांचं काय?’’

“त्यांची एक ओळ आहे. एक माझा प्रश्न साधा लाख येती उत्तरे, हे खरे की ते खरे की ते खरे की हे खरे… तशी तुझ्या एका प्रश्नाची लाखभर उत्तरे असू शकतील. आज मिळतील तेवढी वर्तमानपत्रे घे. सोशल साईटवर जा. लिहिता येणारा प्रत्येक जण नितिशकुमारच्या राजीनाम्याचं वेगळं कारण सांगत असेल.’’

“पण त्यातलं खरं कारण कोणतं?’’

“राजकारण. राजकारण हेच त्याचं खरं कारण. त्यांना लालूप्रसाद यादवांशी पटवून घ्यायचा कंटाळा आला असेल. विरोधकांना आता भवितव्य उरलं नाही असं त्यांना वाटलं असेल. पूर्वी त्यांना एनडीएचा कंटाळा आला होता तसा आता महागठबंधनाचा कंटाळा आला असेल. त्यांनी राजीनामा लिहिला. पण त्याचा कागद नुसता खिशात न ठेवता थेट राज्यपालांकडे दिला. त्यांच्या मनातली खरी गोष्ट आपण कशी ओळखणार?’’

नाग्याचं समाधान झालं होतं की नाही कुणास ठाऊक. पण वेटरने बिल आणून दिल्यावर त्याने निमूटपणे खिशात हात घातला. बाहेर पडताना मी त्याला म्हणालो, “नाग्या एका मराठी शब्दाला बिहारी भाषेत काय म्हणतात हे शोध. कदाचित तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तो शब्द म्हणजे पुलोद.’’