|Thursday, November 14, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत सर्वबाद 600, प्रत्युत्तरात लंकेची दैना!

भारत सर्वबाद 600, प्रत्युत्तरात लंकेची दैना! 

वृत्तसंस्था /कोलंबो :

येथील पहिल्या कसोटीत तळाची शेपटी चांगलीच वळवळल्यानंतर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 600 धावा जमवल्या असून प्रत्युत्तरात यजमान लंकन संघाची दुसऱया दिवसअखेर 5 बाद 154 अशी दाणादाण उडाली. सध्या लंकन संघ केवळ 4 गडी हाताशी असताना तब्बल 446 धावांनी पिछाडीवर आहे. असेला गुणरत्ने दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला असल्याने लंकेला या सामन्यातील दोन्ही डावात केवळ 10 फलंदाजांनिशीच खेळावे लागणार आहे. त्यामुळे, अर्थातच त्यांच्यासमोर बिकट स्थिती असेल. गुरुवारी या लढतीच्या दुसऱया दिवसअखेरीस अँजिलो मॅथ्यूज 54 व दिलरुवन परेरा 6 धावांवर नाबाद राहिले.

शिखर धवन (190), चेतेश्वर पुजारा (153) यांच्या शतकानंतर अजिंक्य रहाणे (54) तसेच पदार्पणवीर हार्दिक पंडय़ा (50) यांनी शानदार अर्धशतके झळकावल्यानंतर भारताने सर्वबाद 600 धावांचा डोंगर रचला. चहापानाला थोडा अवधी बाकी असताना भारताचा डाव संपुष्टात आला. पुढे, चहापानापर्यंत लंकेने 1 बाद 38 धावा जमवल्या. मात्र, शेवटच्या सत्रात त्यांची चांगलीच पडझड झाली. लंकन संघाने या सत्रात 116 धावा जमवल्या असल्या तरी त्यांना यासाठी 4 फलंदाज गमवावे लागले. भारतीय संघातर्फे मोहम्मद शमीने 2 तर रविचंद्रन अश्विन व उमेश यादवने प्रत्येकी एक बळी घेतला.

यजमान संघाची खराब सुरुवात

भारताच्या 600 धावांच्या डोंगरासमान धावसंख्येला प्रत्युत्तर देताना लंकेची सुरुवातच मुळात खराब झाली. यजमान संघाच्या खात्यावर केवळ 7 धावा असताना उमेश यादवने करुणारत्नेला 2 धावांवर बाद केले. त्यानंतर उपूल थरंगा व गुणथिलकाने संघाची धावसंख्या 68 पर्यंत नेली. मात्र, या धावसंख्येवर शमीने गुणथिलका (16) व कुशल मेंडिस (0) यांना एकाच षटकात बाद केल्यानंतर लंकेची 1 बाद 68 वरुन 3 बाद 68 अशी पडझड झाली. उपुल थरंगाने 44 चेंडूत जलद अर्धशतक जरुर केले. पण, नंतर तो विचित्र पद्धतीने धावचीत झाला. लंकन संघाच्या खात्यावर 143 धावा असताना अश्विनने वैयक्तिक 50 व्या कसोटीतील पहिला बळी नोंदवताना निरोशन डिकवेलाला 8 धावांवर तंबूत धाडले.

Related posts: