|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण चुकीचे

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण चुकीचे 

प्रतिनिधी/ सोलापूर

भारत-चीन सीमावाद दिवसेंदिवस वाढत असून याला मोदी सरकारच कारणीभूत आहे. सत्ताधाऱयांच्या चुकीच्या धोरणांमुळे सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परराष्ट्र धोरण कसे हाताळले पाहिजे हेच सरकारला माहिती नसल्याने देशावर संकटे आली आहेत, अशी प्रतिक्रिया अखिल भारतीय काँगेस कमिटीचे सरचिटणीस व हिमाचलप्रदेशचे प्रभारी सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. हिमाचलप्रदेशचे प्रभारीपद स्वीकारल्यानंतर ते प्रथमच सोलापूरला आले. दरम्यान त्यांचे काँग्रेसभवनमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी प्रकाश यलगुलवार, धर्मा भोसले, चेतन नरोटे, हेमा चिंचोलकर आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, शेजारच्या देशांशी नेहमी सलोख्याचे संबंध असले पाहिजे. पण मोदी बिलकुल याच्या उलट काम करत आहेत. भारतापासून लांब राहणाऱया देशांना भेटी देऊन येतात आणि शेजारच्या देशांशी दुष्मनी बाळगतात. जर मोदी थेट चीनला जावून भेटले असते तर आज सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले नसते. चीन व पाकिस्तान सुरूवातीपासूनच भारताशी द्वेषाने वागतो. अशा वेळेस त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागणे महत्वाचे आहे. जर उभय देशांमध्ये युद्ध सुरू झाले तर ते भारताला परवडणारे नाही. त्यामुळे सामान्य जनता बेहाल होईल. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. त्यामुळे मोदींनी उताविळता सोडून परराष्ट्र धोरणांकडे लक्ष दिले पाहिजे. इंदिरा गांधींनी पाकिस्तानपासून बांग्लादेशाला वेगळे केल्यानंतरही तत्कालिन पाकच्या पंतप्रधानांना सिमला येथे बैठकीसाठी बोलावले होते. इतकी ताकद त्यांच्याकडे होती. चीनला प्रत्येक वेळेस विरोध करणे चुकीचे आहे. आपलंही कुठेतरी चुकतं आहे, त्याकडे मोदी सरकारने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. आताही जास्त वेळ गेलेली नाही. चीनशी भेट घेवून त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागल्यास सीमेवरील ताण कमी होऊ शकतो. मात्र सरकार परराष्ट्र धोरण चुकीच्या पद्धतीने चालवित आहे. त्यामुळे भारताला मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागेल, याकडेही सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष वेधले.

नेहरू आणि गांधी घराण्यांना नावे ठेवण्यातच विरोधक संतुष्ट मानतात. स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गामाता म्हणून संबोधले होते. पण वारंवार राहुल गांधी यांना लक्ष्य करून टिंगल करणे हे सरकारला न शोभण्यासारखे आहे. राहुल गांधी यांना जवळून ओळखणाऱयांनाच त्यांची किंमत माहित आहे. राहुल हे अत्यंत हुशार असून, देशाची नौका पेलण्यासाठी ते समर्थ आहेत. दरम्यान प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाबाबत विचारले असता शिंदे यांनी सध्यातरी शक्यता नसल्याचे स्पष्ट केले.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काँगेसच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करूनच माझ्याकडे हिमाचलप्रदेशची जबाबदारी दिली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीला सरकार बदलत होते. पण आगामी निवडणुकीत हिमाचलमध्ये पुन्हा काँगेसच सत्तेत येणार आहे. मोदी सरकारवर जनता पूर्णपणे नाराज आहे. याचा फायदा घेवून आम्ही सत्तेत बसणार आहोत, असेही शिंदे यांनी व्यक्त केले.

सीबीआयचा सरकारकडून गैरवापर

मोदी सरकार सीबीआयचा गैरवापर करीत आहे. देशात सीबीआयची जी छापेमारी सुरू आहे त्यात सर्व काँगेसच्या लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे सीबीआयचा गैरवापर होत असल्याची शंका बळावत आहे, असे ते म्हणाले.

सेना-भाजपाचे भांडण हे फक्त नावालाच

राज्यात सेना आणि भाजपामध्ये जे भांडणे होताना दिसते ते फक्त नावालाच आहे. खरे म्हणजे दोघेही एकत्रतच आहेत. सेनेसारखे नुसती आक्रमता दाखवून चालणार नाही. जनतेचे काम करणे महत्वाचे आहे. नुसते आक्रमक झाल्यास कोणतेही काम पूर्ण होणार नाही, असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेलाही लक्ष्य केले.

मोहन भागवत अतिरेकी प्रकरणी संबंध नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना काँगेस सरकारच्या काळात दहशतवादी ठरविण्याबाबत वक्तव्य करण्यात आले होते. याप्रकरणाची आपला काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करुन शिंदे म्हणाले, त्यावेळी मी केंदात गृहमंत्री नव्हतो. स्वामी स्वरूपानंद कारागृहात असताना जे वक्तव्य केले होते, ती डायरी प्रसिद्ध करा. यातून खरे काय ते स्पष्ट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: