|Monday, August 26, 2019
You are here: Home » उद्योग » भारतातून 2,100 विमानांची मागणी

भारतातून 2,100 विमानांची मागणी 

20 वर्षात मागणी वाढण्याचा बोईंगला विश्वास   प्रवासी संख्येत वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय हवाई सेवा कंपन्यांकडून पुढील 20 वर्षांत 2,100 नवीन विमानांची मागणी करण्यात येईल. या विमानांसाठी कंपन्यांकडून 290 अब्ज डॉलर्स खर्च करण्यात येणार आहेत. हवाई प्रवासी संख्येत भारत ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत वर्षाच्या आधारे 20 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होत आहे, असे बोईंग या विमान निर्माता कंपनीकडून सांगण्यात आले.

भारतात स्वस्त दराने मिळणारी हवाई सेवा, इंधनाच्या दरात कमी, लहान शहरांमध्ये सेवेचा विस्तार यामुळे देशातील हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. दक्षिण आशियामध्ये प्रवाशांच्या संख्येत 8 टक्क्यांनी वाढ होईल. यामध्ये पुढील 20 वर्षांत भारत आघाडीवर असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 4.7 टक्के आहे. देशातील लहान शहरे विमान सेवेने जोडण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. याला कशा प्रकारे यश येत आहे, त्यानुसार कंपनी आपला विस्तार करणार आहे, असे बोईंग कर्मशियल एअरप्लेन्सच्या आशिया पॅसिफिक आणि भारतातील विक्री विभागाचे उपाध्यक्ष दिनेश केसकर यांनी सांगितले.

भारतात अल्प किमतीत विमान सेवा पुरवणाऱया कंपन्यांचे वर्चस्व आहे. सध्या देशातील 60 टक्के बाजारावर त्यांचा हिस्सा आहे. पुढील 20 वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवरून 41,030 विमानांची मागणी करण्यात येईल. यामध्ये भारताचा हिस्सा 5 टक्के असेल असा कंपनीचा अंदाज आहे. भारतातील या नवीन मागणीमध्ये सर्वाधिक प्रमाण हे एक इंजिन असणाऱया विमानांचे आहे. यामुळे हवाई वर्दळ वाढणार आहे.