|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला

दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला 

आंबोली आंबोली गेळे येथील कावळेसाद पॉईंटवर दरीत कोसळलेल्या गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) येथील दोघा पर्यटकांसाठी मंगळवारी शोध मोहीम घेण्यात आली. त्यात सांगेलीच्या बाबल आल्मेडा टिमला एक मृतदेह दृष्टिक्षेपास पडला. हा मृतदेह इम्रान गारदी यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाऊस आणि दाट धुक्यामुळे मृतदेह बाहेर काढता आला नाही. बुधवारी शिरशिंगेमार्गे दरीत पोहोचून दृष्टिक्षेपास पडलेला मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे. तसेच बेपत्ता प्रसाद राठोड या दुसऱया पर्यटकाचाही शोध घेण्यात येणार आहे.

 आंबोली कावळेसाद पॉईंट येथे गडहिंग्लजहून सात पर्यटक सोमवारी वर्षा पर्यटनासाठी आले होते. पैकी इम्रान गारदी व प्रसाद राठोड हे दरीत कोसळले. दरी एक हजार फूटाहूनही अधिक खोल असल्याने व दाट धुक्यामुळे तसेच सायंकाळी ही घटना घडल्याने सोमवारी त्यांचा शोध घेणे अशक्य होते. मंगळवारी निरीक्षक अरुण जाधव यांच्या उपस्थितीत शोध मोहीम हाती घेण्यात आली. सांगेली येथील बाबल आल्मेडा टीम, कोल्हापूरचा समीर ऍडव्हेंचर हिल रायडर्स गुप, वेस्टर्न माऊंटन स्पोर्टस् ग्रुप आणि आंबोलीच्या ग्रामस्थांनी सकाळपासून शोध मोहीम सुरू केली. मात्र, खोल दरी, दाट धुके आणि पाऊस असल्याने शोध मोहिमेत अडचणी आल्या. नंतर गडहिंग्लजहून क्रेन मागविण्यात आली. या क्रेनच्या सहाय्याने सांगेलीचे बाबल आल्मेडा, किरण नार्वेकर आणि कोल्हापूर रेस्क्यू टीमचे सदस्य दरीत उतरले. त्यांनी शोध घेतली असता एका पर्यटकाचा मृतदेह आढळला. अंगावर लाल शर्ट होता तसेच मृतदेह फुगलेल्या अवस्थेत होता. हा मृतदेह इम्रान गारदींचा असल्याचे स्पष्ट झाले. प्रसाद राठोड यांचा शोध लागू शकला नाही. ते वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली.

गारदी यांचा मृतदेह वाहत्या प्रवाहात होता. सायंकाळ झाल्यामुळे तसेच धुके व पावसामुळे मृतदेह बाहेर काढता आला नाही. हा मृतदेह बुधवारी शिरशिंगेमार्गे जाऊन काढण्यात येणार आहे. तसेच दुसऱया पर्यटकाचा शोधही घेण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या टीमचे नेतृत्व विनोद कंबोज करीत होते. तीनही टीममध्ये दहा सदस्य होते. सिंधुदुर्ग आपत्ती व्यवस्थापनाचे नितीन ऐनापुरे, हवालदार विश्वास सावंत, प्रकाश कदम, गुरुदास तेली हेही शोध मोहिमेत सहभागी झाले हाते.

आज मृतदेह बाहेर काढणार

बुधवारी पहाटे सहा वाजता सांगेली येथील टीम शिरशिंगे गोठवेवाडी येथून घटनास्थळी निघणार आहे. हे अंतर 14 ते 15 किलोमीटर आहे. घनदाट जंगल तसेच कुठलाही मार्ग नसल्याने पाण्यातूनच त्यांना घटनास्थळापर्यंत पोहोचावे लागणार आहे. यात त्यांना घटनास्थळी पोहोचण्यास किमान सहा ते सात तास लागणार आहेत. त्यानंतर मृतदेह पुन्हा शिरशिंगे येथेच आणावा लागणार आहे. त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास सायंकाळचे सात ते साडेसात वाजण्याची शक्यता आहे. तसेच कावळेसाद भागात अधून-मधून पाऊस सुरूच आहे. गारदी यांचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात जाग्यावरून हलल्यामुळे वाहून जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे या मोहिमेत बऱयाच अडचणी आहेत. त्याचबरोबर बेपत्ता असलेल्या प्रसाद राठोड यांचाही शोध या पथकाला घ्यायचा आहे. मंगळवारी क्रेनद्वारे तिघेजण दरीत उतरले होते. मृतदेहापर्यंत ते पोहोचलेही होते. मात्र पडू लागलेला अंधार, मृतदेहाला बांधण्यासाठी वरून टाकलेली दोरी त्यांच्यापर्यंत न पोहोचल्याने त्यांना हा मृतदेह काढता आला नव्हता. याही मार्गाने उद्या मृतदेह काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दोन वर्षांपूर्वी दोन तरुण कावळेसाद पॉइँटच्या त्याच स्पॉटवरून खाली कोसळले होते. त्यांचे मृतदेह नदीपात्रातून खाली गेले होते. शिरशिंगेमार्गेच जाऊन ते मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

Related posts: