|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » प्रताप उजगरेचा मृतदेह बाहेर

प्रताप उजगरेचा मृतदेह बाहेर 

वार्ताहर/ आंबोली

आंबोली-गेळे येथील कावळेसाद पॉईंटवरून दरीत कोसळलेल्या दोघा पर्यटकांपैकी एकाचा मृतदेह काढण्यात अखेर सांगेलीच्या बाबल आल्मेडा टीमला चौथ्या दिवशी यश आले. प्रताप उजगरे (21) असे त्याचे नाव आहे. चौथ्या दिवशी अवघ्या तीन तासात प्रतापचा मृतदेह काढण्यात बाबल आल्मेडा टीमला यश आले. दरम्यान, आल्मेडा टीमने दुसरा पर्यटक इम्रान गारदी याचा सायंकाळी पाच वाजेपर्यंत शोध घेतला. परंतु तो न सापडल्याने मोहीम थांबविण्यात आली. आता इम्रानच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची टीम शनिवारी आंबोलीत दाखल होणार आहे. शुक्रवारी पावसाने उसंत घेतल्याने मृतदेह काढणे सहज शक्य झाले.

कावळेसाद पॉईंटवरील दरीत सोमवारी 31 जुलैला गडहिंग्लज येथील इम्रान गारदी आणि प्रताप उजगरे हे दोघे पर्यटक मद्याच्या धुंदीत एक हजार फूट खोल दरीत कोसळले होते. त्या दोघांची एक ऑगस्टपासून शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यात पहिल्या दिवशी इम्रानचा मृतदेह शोधपथकाला आढळला होता. परंतु मुसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे तो काढता आला नव्हता. त्यानंतर शोध पथकाने दोन ऑगस्टला शोधमोहीम राबविली. परंतु त्यावेळी इम्रानचा मृतदेह वाहून गेल्याने स्पष्ट आले. प्रतापचा मृतदेह शोधपथकाच्या दृष्टिक्षेपास पडला होता. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे मृतदेह वर काढता आला नाही. बुधवारी मृतदेह शोधण्यासाठी दरीत थांबलेले शोधपथकातील अनिकेत कोदे आजारी पडले. मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे शोधमोहीम जमणार नसल्याचे कोदे तसेच विनायक कालेलकर यांनी सांगिल्यामुळे दरीत फसलेल्या या दोघांना काढण्यासाठी बाबल आल्मेडा टीमचा तिसरा दिवस खर्ची झाला.

                           अखेर मृतदेह काढला

प्रताप उजगरेचा मृतदेह दरीत दगडात अडकला होता. तर इम्रान गारदीचा मृतदेह वाहून गेला होता. या दोघांचे मृतदेह काढण्यासाठी गुरुवारी लोणावळा येथील शिवदुर्ग टीम आली होती. या टीमला प्रशासनाने थांबवत बाबल आल्मेडा टीमवर भरोसा दाखविला. मृतदेह काढण्याची जबाबदारी आल्मेडा टीमला देण्यात आली. त्यांनी सकाळी अकरा वाजता मोहीम सुरू केली. टीमचे बाबल आल्मेडा, किरण नार्वेकर, दाजी नार्वेकर, संतोष नार्वेकर सकाळी अकरा वाजता गेळेमार्गे दरमजल करत उतरले. त्यानंतर दुपारी एक वाजता प्रताप उजगरेचा मृतदेह अन्य सहकाऱयांच्या सहाय्याने दरीतून वर काढण्यात आला. एक मृतदेह काढल्याची मोहीम आल्मेडा टीमने फत्ते केली.

                                  वॉकी-टाकी नाही

प्रशासनाने या टीमला वॉकी-टॉकी दिली नसल्याने मृतदेह काढतांना अडचणी येत होत्या. वॉकी-टॉकी नसल्याने टीमच्या दरीत उतरलेल्या सदस्यांना दरीबाहेरील सदस्यांशी हातवारे करूनच संपर्क साधावा लागला. त्यामुळे प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

                             इम्रानसाठी आज मोहीम

प्रतापचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर आल्मेडा टीमने सायंकाळपर्यंत
इम्रानचा मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबविली. परंतु सायंकाळपर्यंत मृतदेह सापडला नाही. त्यामुळे मोहीम थांबविण्यात आली. सांगेलीची टीम शनिवारी पुन्हा शोधमोहीम राबविणार आहे. त्याशिवाय मृतदेह शोधण्यासाठी एनडीआरएफची टीमही दाखल होणार आहे.

                          तहसीलदार कदम धारेवर

दोघे पर्यटक दरीत कोसळल्यानंतर कोल्हापूरच्या हिल रायडर्स, सातारच्या समीर ऍडव्हेंचर, सांगेलीची बाबल आल्मेडा टीम आणि आंबोली ग्रामस्थांनी त्यांच्या शोधासाठी मोहीम राबविली. या काळात शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कुठेच दिसले नाही. तर महसूलचे मंडळ अधिकारी एस. एस. ठाकुर, तलाठी बी. डी. डवरे घटनास्थळी होते. परंतु तहसीलदार पोहोचले नव्हते. शुक्रवारी पाचव्या दिवशी तहसीलदार सतीश कदम गेळेत पोहोचले. त्यांना गेळे ग्रामस्थांनी धारेवर धरले. इतके दिवस कुठे होता? प्रशासन यंत्रणा काय करत होती, असा सवाल सरपंच
प्रज्ञा गवस, माजी सरपंच मनोहर बंड यांनी तहसीलदारांना केला. त्यांनी यावेळी थातुरमातूर उत्तरे दिली. त्यामुळे ग्रामस्थांच्या संतापात भर पडली.

सांगेलीच्या आल्मेडा टीममध्ये पंढरी राऊळ, अभय किनळोसकर, वामन नार्वेकर, संतोष नार्वेकर, आपा आंगचेकर, सागर सांगेलकर, संतान रॉड्रिग्ज, सचिन नार्वेकर, आर. एन. रेडीज, प्रकाश रेडीज, दाजी माळकर, सुरेश राऊत, संतोष नार्वेकर, शैलेश राऊळ, गजानन देसाई, गुरुप्रसाद सावंत यांचा समावेश होता. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक अरुण जाधव, हवालदार विश्वास सावंत, प्रकाश कदम, गुरुदास तेली, गजानन देसाई, दत्तप्रसाद कलगौंडा तसेच आंबोली, गेळे, सांगेलीचे ग्रामस्थ मोहिमेला सहकार्य करत होते.

                       आपत्कालीन यंत्रणा कुठे आहे?

31 जुलैला दोन पर्यटक दरीत कोसळल्यानंतर नेहमी रंगीत तालमीत गुंतलेली आपत्कालीन यंत्रणा कुठे गेली, असा सवाल विचारला जात आहे. पाच दिवस होऊनही या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणेचे कुणीच फिरकले नाही. आपत्कालीन यंत्रणेसाठी ज्या सुविधा, साहित्य उपलब्ध असते, त्या यंत्रणा येथे दिसल्याच नाहीत. प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार सतीश कदम चार दिवस झाले तरी आंबोलीत फिरकले नाहीत. चार दिवसांनी सतीश कदम घटनास्थळी आले. त्यांना ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. आपत्कालीन व्यवस्था आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज आहे की नाही, हे तपासण्यासाठी रंगीत तालीम घेतली जाते. त्यात ही यंत्रणा सक्षम असल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्यक्षात आपत्कालीन परिस्थितीत या यंत्रणेची पाटी कोरीच असल्याचे दिसून येते. याचा अनुभव या घटनेवेळीही आला. या व्यवस्थेवर लाखो रुपयांचा जो खर्च केला जातो, तो कशासाठी, असा सवालही यानिमित्त उपस्थित केला जात आहे.

                              दु:खातही खडे बोल

मूळचा बीड येथील प्रताप उजगरे याचे वडील अण्णासाहेब उजगरे मंगळवारी आंबोलीत दाखल झाले. दरीत कोसळून मुलाचा मृत्यू झाल्याचे पिता म्हणून त्यांना अतिव दुःख होतेच. मात्र, बुधवारी प्रताप व इम्रान गारदी मद्याच्या धुंदीत दरीत कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याबाबत बोलतांना त्यांनी ‘नशिबात असेल ते होणार. परंतु आपल्या मुलाने असा प्रकार करून आपले जीवन मृत्यूच्या खाईत लोटता नये होते. आंबोलीत येणाऱया पर्यटकांनी मद्यप्राशन करून असे कृत्य करू नये’, असे सांगितले. प्रतापचे यंदा लग्न करायचे होते. त्यासाठी वडिलांनी त्याला शनिवारी घरी मुलगी पाहायला जाण्यासाठी बोलावले होते. परंतु प्रतापने रविवारी  पर्यटनासाठी जाणार आहोत. त्यानंतर सोमवारी घरी यायला निघतो, असे वडिलांना सांगितले. परंतु प्रताप रविवारी न जाता सोमवारी आंबोलीत आला आणि हा दिवस त्याचा अखेरचाच ठरला.

                व्हिडिओसंदर्भात गुन्हा दाखल करावा!

आंबोलीत प्रताप उजगरे आणि इम्रान गारदीसोबतच अन्य पाच सहकारी पर्यटनासाठी आले होते. कावळेसाद येथे दरीत दोघेही कोसळले. दरीत कोसळतांनाचा प्रकार त्यांच्या मित्रांनी मोबाईलवर चित्रित केला. व्हायरल व्हिडिओमुळे हे सत्य समोर आले. दरीत पडण्यापासून त्यांना कुणी रोखले नाही. त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱयांनी त्यांना वाचविले नाही. एक दोन तीन.. हिंमत असेल तर करून दाखवा, अशी चिथावणी कुणीतरी देतांना ऐकू येत आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमित वेंगुर्लेकर यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.

Related posts: