|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘पल्स’च्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींचा मंगळवारी मुकमोर्चा

‘पल्स’च्या गुंतवणूकदार व प्रतिनिधींचा मंगळवारी मुकमोर्चा 

प्रतिनिधी/ सेनापती कापशी

‘पल्स’ कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे ताबडतोब द्यावेत यासाठी गुंतवणूकदार व    प्रतिनिधी यांचा दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढण्यात येणार आहे. मंगळवार दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 12.30 यावेळेत मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन आमदार हसन मुश्रीफ यांना समर्थ क्रांती कस्टमर असोसिएशनच्या देण्यात आले आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पल्स ऍग्रोटेक कार्पोरेशन लिमिटेड दिल्ली (पीएसीएल) या कंपनीची 1983 ला स्थापना आहे. ग्राहकांना अनेक आमिषे दाखवून अल्पमुदतीच्या ठेवी घेतल्या आहेत. या कंपनीने गावोगावी आपले एजेंट नेमले होते. त्यांच्याकरवी ठेवी जमा केल्या. जमा झालेली रक्कम रिएल इस्टेटमध्ये गुंतवली आहे. केवळ कोल्हापूर जिल्हय़ाचा विचार करता 500 कोटीची गुंतवणूक झाली आहे. राज्यातील हा आकडा तीन हजार कोटींचा आहे.

कंपनीने आपले सर्व व्यवहार हे सन 2013 पर्यंत अतिशय सुरळीत सुरू ठेवले होते. ठेवी ठेवलेल्या ठेवीदारांना व्यवस्थितपणे परतफेड केली आहे. त्यानंतर मात्र या कंपनीने ठेवीदारांना पैसे परत केले नाहीत. दरम्यानच सेबीने कंपनी विरोधात    आर्थिक निकशाबाबत सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला होता. कोर्टाने या       प्रकरणाची तपासणी करण्यासाठी आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखाली कमिटी नेमून माहिती घेतल्यानंतर कंपनीची सर्व मालमत्ता विकून तीन महिन्याच्या आत गुंतवणूकदारांना पैसे परत करावेत असा आदेश 2 फेब्रुवारी 2016 ला कोर्टाने दिला आहे. मात्र आज 17 महिने होवूनही गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळाले नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून ग्राहक व कंपनीचे प्रतिनिधी आज अडचणीत सापडले असून त्यांच्यामध्ये एकच खळबळ माजली आहे.

कंपनीने रियल इस्टेटमध्ये पैसे गुंतवले असून कंपनीची सध्याच्या घडीला मोठी स्थावर मालमत्ता आहे. स्थावर विकून सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत देवून        प्रचंड संपत्ती शिल्लक राहिल अशी परिस्थिती असल्याचे बोलले जाते. मात्र यावर ठोस निर्णय होत नसल्याने सर्वचजण अडचणीत सापडले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर कंपनीच्या प्रतिनिधींनी गुंतवणूकदारांच्या मदतीने समर्थ क्रांती कस्टमर असोसिएशनची स्थापना करून यामार्फत लढा देत आहेत. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या वेळेत सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी असोसिएशनमार्फत दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मुकमोर्चा काढण्यात आहे. या मोर्चात  गुंतवणूकदारांनी सामील व्हावे. असे आवाहन एस. बी. पाटील, पी. व्ही. पाटील (दोघेही रेंदाळ), जी. एम. पाटील (इंगळी) यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करू असे आश्वासन असोसिएशनला दिले आहे. यावेळी एस. बी. पाटील, पी. व्ही. पाटील, जी. एम. पाटील यांच्यासह राजेंद्र माने आदी उपस्थित होते.