|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शरद यादव समर्थकांची संजदमधून हकालपट्टी

शरद यादव समर्थकांची संजदमधून हकालपट्टी 

माजी मंत्र्यांसह 21 नेत्यांना केले निलंबित

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर शरद यादव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दोघांमध्ये संघर्षाची बिजे रोवली गेली आणि दिवसेंदिवस हा संघर्ष आणखीनच तीव्र होऊ लागला आहे. सोमवारी शरद यादव समर्थक 21 नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. बिहार प्रदेश अध्यक्ष वशिष्ट नारायणसिंह यांनी ही यादीच जाहीर केली आहे. यामुळे संजदमध्ये फूट पडण्याची शक्यता व्यक्त  होत आहे.

संजदची लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार आहे. मात्र या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमधील संघर्ष, मतभेद अधिक तीव्र होताना दिसत आहेत. त्यांनी पक्षातील शरद यादव समर्थकांना ठिकाण्यावर आणण्याचे पाऊल उचलले आहे. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष वशिष्ठ नारायणसिंह यांनी शरद यादव समर्थक 21 नेत्यांचे प्राथमिक सदस्य निलंबित करून त्यांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये माजी मंत्री आणि माजी खासदार रमईराम, सीतामढीचे खासदार अर्जुन राय या सारख्या दिग्गजांची नावे आहेत. याशिवाय माजी आमदार राजकिशोर सिन्हा, विजय वर्मा, विन्देश्वरी सिंह, जिल्हाध्यक्ष सियाराम यादव, इसराइल मन्सुरी यांच्यासह अनेक जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्षांचा समावेश आहे. या सर्वांवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.