|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » लीजधारकांना मनपाची नोटीस

लीजधारकांना मनपाची नोटीस 

प्रतिनिधी/   बेळगाव

महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा लीजची मुदत संपल्याने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. सदर जागा 45 दिवसात रिकामी करण्याची नोटीस महापालिकेने लीजधारकांना बजावली आहे. तसेच आतापर्यंतचे थकित भाडे वसूल करण्याचा आदेश आयुक्त न्यायालयाने दिला आहे. यामुळे लीजधारकांमध्ये खळबळ माजली आहे.

  महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी 119 जागांची लीजची मुदत संपुष्टात आल्याने जागा ताब्यात घेण्याची मोहीम 2014 पासून हाती घेण्यात आली आहे. पण यश आले नव्हते. मात्र अलीकडेच महापालिका आयुक्त न्यायालयात सदर जागा महापालिकेने ताब्यात घेण्याचा निर्णय झाला असून 45 दिवसात जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याची नोटीस लीजधारकांना बजावण्यात आली आहे.

 यापूर्वी महापालिकेच्या कायद्यानुसार लीजधारकांना नोटीस बजावून लीजची मुदत संपल्याने जागा रिकामी करण्याची सूचना करण्यात आली होती. पण लीजधारकांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावून महापालिका आयुक्त न्यायालयात हरकत दाखल करण्याची सूचना करण्यात आली होती. तसेच हरकत दाखल करण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला होता. पण काही लीजधारकांनी हरकत दाखल केली नाही. काहींनी लीज वाढवून देण्याची मागणी न्यायालयात केली होती. यामुळे 58 जागांबाबत आयुक्त न्यायालयात सुनावणी झाली असून लीज संपलेल्या जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच थकित भाडे वसूल करण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे लीजधारकांना नोटीस बजावून 45 दिवसात जागा रिकामी करण्याची सूचना करण्यात आली आहे. लीज संपलेल्या जागा पुन्हा भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव आयोजित करण्याचा आदेश नगरविकास खात्याने दिला आहे. यामुळे लीजधारकांना मुदतवाढ देता येणार नाही. लीजधारकांनी जागा रिकाम्या करून महापालिकेकडे हस्तांतर कराव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related posts: