|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोरेगाव बंद

कोरेगाव बंद 

 

प्रतिनिधी/ सातारा  

कोरेगाव, दि. 23 (प्रतिनिधी) : शहरात कोणाच्याही अध्यामध्यात नसलेला आणि कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा दाखल नसलेल्या शंभूराज बबन बर्गे या युवकाचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला आहे. या घटनेला 24 तास उलटून गेले तरी हल्लेखोर मोकाट असून, पोलीस यंत्रणा प्रभावीपणे त्यांचा शोध घेत नसल्याच्या निषेधार्थ बर्गे कुटुंबीय व नागरिकांनी बुधवारी कोरेगाव बंदची हाक दिली होती, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केवळ अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार बंद होते. नागरिकांनी मूक मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन सादर केले. सातारा-पंढरपूर रस्त्यावर जुना मोटार स्टँड येथे स्व. बर्गे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता. 

सोमवारी सायंकाळी झालेल्या किरकोळ भांडणातून शंभूराज बबन बर्गे (वय 30) याची रॉम्बो चाकूने वार करुन सोमवारी रात्री 10.30 च्या सुमारास नवीन एस. टी. स्टँडसमोरील एका हॉटेलसमोर खून करण्यात आला होता. या खुनानंतर हल्लेखोर फरार झाले असून, पोलिसांना अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस अधिकारी तपासाच्या नावाखाली वेळकाढूपणा करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी रात्री वेताळगल्ली-टेक येथील हनुमान मंदिरात नागरिक व युवक कार्यकर्त्यांची तातडीची बैठक झाली आणि त्यामध्ये कोरेगाव बंद ठेवण्याचा  व मूक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. रात्रीच पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांना निवेदन सादर करण्यात आले. 

बुधवारी सकाळपासून शहरात तणावपूर्ण वातावरण होते. सर्व व्यवहार बंद होते, शाळा व महाविद्यालयांची वेळ झाल्याने रस्त्यावर गर्दी होती, मात्र शाळा व कॉलेज प्रशासनाने बंदमध्ये सहभागी होत शाळा-महाविद्यालये बंद ठेवली, त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. हॉस्पिटल्स, औषध दुकाने व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा सुरळीत सुरु होती. एस. टी. स्टँड परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पेट्रोल पंप व रिक्षा चालक देखील बंदमध्ये सहभागी झाले. चौकाचौकात पोलीस बंदोबस्त होता. 

सकाळी 9 वाजल्यापासून बाजार मैदानावर युवक कार्यकर्ते व नागरिक जमू लागले होते. 10.30 वाजता मैदानापासून मूक मोर्चास सुरुवात झाली. बाजार पेठ- साकव पूल-कळकाई गल्ली-केदारेश्वर मंदिर रस्ता-सातारा जकात नाका-आझाद चौक मार्गे मोर्चा कापडपेठेतील प्रांताधिकारी कार्यालयात आला. मोर्चाचे निवेदन सर्वांसमक्ष प्रांताधिकार्यांनी स्वीकारावे, असा पवित्रा नागरिकांनी घेतला, तसा निरोप पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे यांनी प्रांताधिकारी सौ. कीर्ती नलावडे यांना दिला, त्यांनी त्यास होकार देत कार्यालयासमोर येऊन मोर्चाच्यावतीने निवेदन स्वीकारले, यावेळी नागरिकांच्या भावना काय आहेत, याची त्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी प्रशासन तुमच्या मागण्यांबाबत सहमत असून, कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई होईल, कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही, अशी ग्वाही दिली. 

त्यानंतर मोर्चा जुना मोटार स्टँड येथे पोहचला. तेथे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयासमोर भर रस्त्यातच नागरिक थांबले आणि त्यांनी शंभूराज बर्गे यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी सर्वजण दोन मिनिटे स्तब्ध उभे राहिले. तेथून मोर्चा तहसीलदार कार्यालयाकडे गेला. तेथील मैदानात नागरिक बसले. निवासी नायब तहसीलदार श्रीरंग मदने हे निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर आले. त्यांना नागरिकांच्या मागण्या सांगण्यात आल्या, त्यांनी कायद्यातील तरतुदींप्रमाणे पोलीस दल कार्यवाही करेल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर मोर्चा जुना मोटार स्टँड- आझाद चौक मार्गे बाजार मैदानावर गेला. तेथे अनेक नागरिकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. 

चौकट

हल्लेखोरांना अटक करा, अन्यथा तीव्र आंदोलन

दरम्यान, नागरिक व युवक कार्यकर्त्यांच्यावतीने प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शंभूराज बर्गे यांची सराईत गुंडांकडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे सराईत गुंडाबरोबर प्रतिष्ठित व्यक्ती व राजकीय व्यक्तीचा हात आहे. पोलीस प्रशासनावर त्यांच्याकडून दबाव आणण्यात येत असून, पोलीस तपासामध्ये हालचाल मंद गतीने करत असल्याचे दिसून येत आहे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही शांततेत बंद पाळत असून, जर आठ दिवसांमध्ये संशयित आरोपींना अटक न झाल्यास शांत आंदोलन चिघळून तीव्र आंदोलनात त्याचे रुपांतर होईल, असा इशारा देण्यात आला आहे.