|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी देवगडात ‘शेल्टर फॉर स्ट्रे’

मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी देवगडात ‘शेल्टर फॉर स्ट्रे’ 

देवगड : मोकाट कुत्र्यांचा व इतर प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी देवगड कॉलेजनजीक ‘शेल्टर फॉर स्ट्रे’ हा प्रकल्प उभारण्यात आला असून याचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. प्रियांका साळसकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आमदार नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड-जामसंडे नगरपंचायत व मायवेटस् चॅरिटेबल ट्रस्ट ऍण्ड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष योगेश चांदोसकर, वैभववाडी नगराध्यक्ष संजय चव्हाण, मायवेटस् चॅरिटेबल ट्रस्ट ऍण्ड रिसर्च सेंटरचे डॉ. युवराज कागिलकर, न. पं. मुख्याधिकारी परितोष कंकाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष कोंडके, पशुवैद्यकीय अधिकारी घोगरे, न. पं. आरोग्य व शिक्षण सभापती संजय तारकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश राणे, शिवसेना तालुकाप्रमुख ऍड. प्रसाद करंदीकर, उल्हास मणचेकर, शहर विकास ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष निशिकांत साटम, नगरसेविका प्रणाली माने, विशाखा पेडणेकर, उज्वला अदम, ज्ञानेश्वर खवळे, दयानंद पाटील, कोकण माती प्रतिष्ठानचे अनिकेत बांदिवडेकर आदी उपस्थित होते. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणारा हा प्रकल्प देवगडमध्ये प्रथमच उभारण्यात आला असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे. न. पं. हद्दीतील मोकाट गुरे, माकडांच्या बंदोबस्तासाठी आगामी काळात उपाययोजना राबविल्या जातील, असे नगराध्यक्षा सौ. साळसकर यांनी सांगितले.

डॉ. कागिलकर यांनी मायवेटस् चॅरिटेबल ट्रस्ट ऍण्ड रिसर्च सेंटरच्या मोहिमेची माहिती दिली. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न संपूर्ण राज्यात आहे. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. कुत्र्यांना मारणे हा त्यावरील पर्याय नसून या कुत्र्यांवर उपचार आवश्यक असतात. यासाठी ही संस्था कार्यरत असून देवगड, जामसंडे हद्दीतील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये एका पशुवैद्यकीय अधिकाऱयासह चार-पाच प्रशिक्षित कर्मचारी, रुग्णवाहिका असणार आहे. ही टीम भटक्या कुत्र्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करणार आहे. जे कुत्रे अपंग, जखमी असतील, त्यांच्यावरही उपचार केले जाणार आहेत. या कुत्र्यांचे संगोपन ही संस्था करणार आहे. कुत्र्यांना लसीकरण, नसबंदी अशा उपाययोजनादेखील केल्या जाणार आहेत. कुत्र्यांची संख्या कमी होऊ नये व त्यांचा उपद्रवही होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे डॉ. कागिलकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपनगराध्यक्ष चांदोसकर यांनीही मत व्यक्त केले.