|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्काऊटच्या विद्यार्थ्यांकडून प्लास्टिकविरोधात जनजागृती

स्काऊटच्या विद्यार्थ्यांकडून प्लास्टिकविरोधात जनजागृती 

वेंगुर्ले : जि. प. शाळा आडेली नं. 1 च्या स्काऊट पथकाच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या ऱहासाकडे लक्ष वेधण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे तसेच जुन्या कॅलेंडरपासून सुंदर आकर्षक पिशव्या तयार करून त्यांच्या वापरासंदर्भात जनजागृती व्हावी, यासाठी त्या आडेली गावात मोफत वितरित केल्या.

या शाळेच्या स्काऊट पथकाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण करण्यात खारीचा वाटा उचलला आहे. सध्या गणेश चतुर्थीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या उत्साहपूर्ण वातावरणात पर्यावरणाच्या होणाऱया ऱहासाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी प्लास्टिकच्या वापरावर आळा घालण्यासाठी जुनी वर्तमानपत्रे, कॅलेंडरपासून सुंदर आकर्षक पिशव्या तयार करून त्याच्या वापरासंदर्भात जनजागृती आडेली गावठणवाडीतील प्रत्येक घरात जाऊन करण्यात आली. प्लास्टिकच्या अतिरेकी वापरामुळे होणारे धोके लोकांच्या लक्षात आणून दिले. बाजारात जाताना कापडी पिशव्या नेण्यास कमीपणा वाटू नये. आवश्यक त्या ठिकाणी कापडी पिशव्यांचा वापर स्वत: करा व इतरांना अशा पिशव्या वापरण्यास प्रवृत्त करा, असे सांगितले. भगतसिंग पथकातील छोटय़ा स्काऊटच्या या अनोख्या लोकजागृतीने ग्रामस्थ प्रभावीत झाले. स्काऊट पथकातर्फे आडेली सरपंच भारत धर्णे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू कोंडसकर व
ग्रामस्थांना कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या पथकाचे स्काऊट मास्तर सीताराम लांबर व  विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. मुख्याध्यापक संजय गोसावी यांनी सहकार्य केले.