|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बंदोबस्तासाठी आलेल्या आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू

बंदोबस्तासाठी आलेल्या आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू 

प्रतिनिधी  / बेळगाव

गणेशोत्सव बंदोबस्तासाठी बिदर जिल्हय़ातून बेळगावला आलेल्या एका पोलीस हवालदाराचा खोलीत झोपेत असतानाच मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी मारुतीनगर येथे ही घटना उघडकीस आली असून दोन दिवसातील ही दुसरी दुर्दैवी घटना आहे. बिदर जिल्हय़ातील त्याच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ते बेळगावात दाखल होणार आहेत. त्यानंतरच उत्तरीय तपासणीचे सोपस्कार करण्यात येणार आहे.

प्रकाश लक्ष्मण बिगेरी (वय 45) असे त्या  पोलीस हवालदाराचे नाव आहे. प्रकाश हे भालकी तालुक्यातील धन्नूर पोलीस स्थानकात हवालदार म्हणून सेवा बजावत होते. गणेशोत्सव बंदोबस्तासाठी 25 ऑगस्ट रोजी बिदर जिल्हय़ातून आलेल्या 40 जणांच्या पहिल्या तुकडीत त्यांचा समावेश होता. मारुतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बंदोबस्तासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

30 ऑगस्ट रोजी विजापूर जिल्हय़ातून बंदोबस्तासाठी बेळगावात आलेल्या भीमाशंकर पुजारी (वय 50) या हवालदाराचा हृदयाघाताने मृत्यू झाला होता. इंडी टाऊन पोलीस स्थानकातून बंदोबस्तासाठी भीमाशंकर यांची नियुक्ती झाली होती. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

बिदर जिल्हय़ातून पहिल्या टप्प्यात 40 व दुसऱया टप्प्यात 75 पोलीस व अधिकारी बंदोबस्तासाठी बेळगावला आले आहेत. पहिल्या तुकडीत बेळगावला आलेल्या प्रकाश यांची प्रकृती ठीक नव्हती. सांबरा रोडवरील मारुतीनगर गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आजारी असूनही ते सेवेत होते.

बिदर जिल्हय़ातून आलेल्या पोलिसांची राहण्याची व्यवस्था गांधीनगर येथील बंटर भवन येथे करण्यात आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रकाश हे बंटर भवनऐवजी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या एका खोलीत राहत होते. गुरुवारी सकाळी 10.30 वाजता नाष्टा करून गणेश मंडपासून जवळ असलेल्या एका चिटफंडच्या कार्यालयात ते झोपायला गेले. त्यानंतर ते मंडपात परतले नव्हते.

गुरुवारी सायंकाळपर्यंत प्रकाश हे गणेश मंडपात आले नाहीत म्हणून कार्यकर्ते त्यांच्या खोलीजवळ गेले. त्यांना उठवण्यासाठी दरवाजा ठोठावण्यात आला नाही. आतून प्रतिसाद आला नाही. मात्र खोलीतून दुर्गंधी येत होती. त्यामुळे माळमारुती पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलिसांनी सायंकाळी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता प्रकाश यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, अमरनाथ रेड्डी, एसीपी शंकर मारिहाळ, व माळमारुतीचे पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांना बेळगावची हवा मानवेना

गणेशोत्सव बंदोबस्तासाठी परजिल्हय़ातून मोठी कुमक मागविण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने ते बेळगावात दाखल होत आहेत. गुलबर्गा, बिदर, विजापूर आदी उष्ण भागातून आलेल्या पोलिसांना बेळगावची हवा मानवेना अशी परिस्थिती आहे. यंदा पोलीस दलाच्यावतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली नाही. शेवटचे तीन दिवस त्यांना जागेवर जेवण पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे परजिल्हय़ातून आलेल्या पोलिसांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

 आजारपणाचाही होत नाही विचार

बंदोबस्तासाठी परजिल्हय़ातून जादा कुवक मागविताना त्यांच्या आजाराचाही विचार होत नाही. कारण एखाद्या जिल्हय़ातून बंदोबस्ताला पाठविताना अधिकाऱयांना डोईजड झालेल्या व आजारी पोलिसांना पाठविले जाते. महिला पोलिसांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. गरोदर व बाळंतिणींनाही बंदोबस्तासाठी झुंपण्याची उदाहरणे आहेत. दोन दिवसात दोन पोलीस हवालदारांचा मृत्यू झाल्याने पोलीस दलावरही त्याचे दडपण आले आहे.