|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » डोळय़ात चटणी टाकून पाच लाखाची बॅग लंपास

डोळय़ात चटणी टाकून पाच लाखाची बॅग लंपास 

वार्ताहर / कुडची

  हारुगेरी क्रॉसवर असलेल्या एका पेट्रोलपंपाची रक्कम बँकेत भरण्यासाठी जाणाऱया व्यवस्थापकाच्या डोळय़ात चटणीपूड टाकून त्याच्याकडील 5 लाख 30 हजार रुपये लांबविले. हारुगेरी क्रॉस व हारुगेरीच्या दरम्यान दुपारी साडेबाराच्या सुमारास घटना घडली.

  हारुगेरी क्रॉसपासून तेरदाळकडे जाणाऱया रस्त्यावर एच. पी. कंपनीचा श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर पेट्रोल पंप आहे. सदर क्रॉसपासून सुमारे 3 ते 4 कि. मी. हारुगेरी गाव आहे. गावातच बँक असल्याने दररोज व्यवस्थापक पैसे गावात जाऊन बँकेत भरत असे. शनिवार व रविवार दोन दिवस सुटी असल्याने बँका बंद होत्या. त्यामुळे दोन दिवसाच्या पेट्रोल-डिझेल विक्रीची रक्कम सोमवारी बँकेत भरण्याचे नियोजन आखले होते. त्यानुसार व्यवस्थापक 5 लाख 30 हजार रुपयांची रक्कम बॅगेत भरुन मोटारसायकलवरून बँकेकडे जात होते. क्रॉसपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर ओढा आहे. तेथेच विट भट्टय़ाही आहेत. साडेबाराच्या सुमारास  एक लाल रंगाची नंबरप्लेट नसलेली पल्सर दुचाकीवरु तिघेजण त्यांचा पाठलाग करत  आले. त्यांनी व्यवस्थापकांच्या आडवी दुचाकी घातली.

 तिघांपैकी मध्यभागी बसलेल्याने तोंडावर रुमाल बांधला होता. लागलीच त्यांनी चटणी काढून त्या व्यवस्थापकाच्या डोळय़ात टाकल्याने व्यवस्थापक गोंधळून गेला. यावेळी दुचाकीवरुन कोसळला.  यावेळी पुढे काही समजण्याच्या आधी ते तिघे पैशांची बॅग घेऊन तेथून पसार झाले. काय घडले? हे लक्षात येताच व्यवस्थापकाने तशाही अवस्थेत त्या तिघांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. लागलीच त्यांनी तोंड धुवून पोलिसांशी व मालकांशी संपर्क केला. सदर घटना घडताना अनेकांनी पाहिले पण कोणीही हालचाल करण्यापूर्वीच चोरटय़ांनी पलायन केले होते.

 ज्या रस्त्यावर ही घटना घडली त्या रस्त्यावर कायम वाहतुकीची मोठी वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी ही धाडसी चोरीची घटना घडल्याने व्यापारीवर्गात भीती पसरली आहे. पोलिसांची पकड ढिली झाल्यानेच चोरांनी दिवसाढवळय़ा दरोडा टाकण्याची हिम्मत दाखविल्याचे परिसरात बोलले जात होते.

हारुगेरी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून अथणीचे पोलीस उपअधीक्षत सतीश चिटगुबी, रायबागचे पोलीस निरीक्षक एस. पी. शिंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून हारुगेरीचे उपनिरीक्षक महंमदरफिक तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना करून चोरीचा छडा लावण्यास सांगण्यात आले आहे.

Related posts: