|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » लढाऊ विमाने उतरू शकतील अशा 17 महामार्गांची बांधणी !

लढाऊ विमाने उतरू शकतील अशा 17 महामार्गांची बांधणी ! 

वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांचे प्रतिपादन :

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

धावपट्टी म्हणून वापर करता येतील अशा 17 महामार्गांची निर्मिती केली जाईल आणि त्यांचे काम चालू वर्षीच सुरू होईल असे प्रतिपादन वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी केले. ई-ऑटोरिक्षा ग्रामीण भागाची गरज असून यावर विचार सुरू आहे. पॉवरग्रिडप्रमाणे वॉटर ग्रिड निर्माण केले जाईल असे गडकरींनी भविष्यातील योजनांची माहिती देत सांगितले. मागील आठवडय़ात झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात गडकरींना नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन खात्यांचा अतिरिक्त भार देण्यात आला.

गंगेला अविरत आणि निर्मळ ठेवण्याची जबाबदारी आता माझ्याकडे आहे. सद्यकाळात सार्वजनिक वाहतूक सेवेला इलेक्ट्रिक ऊर्जेने कार्यान्वित करण्याची गरज आहे. सरकार यासाठी धोरण आणत असून ग्रामीण भागात ई-ऑटोरिक्षा आणि तत्सम वाहने धावू लागतील. ही वाहने लीथियम आयर्न बॅटरीने चालतील. नव्या तंत्रज्ञानामुळे वाहतूक खर्च 40 टक्क्यांनी कमी होईल असा दावा गडकरींनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला.

इलेक्ट्रॉनिक वाहन ठरेल स्वस्त

भारतात कोळसा आणि वीज पुरवठा गरजेपेक्षा अधिक असल्याने ई-वाहने स्वस्त ठरतील. यातून वाहतूक खर्च कमी होत लोकांना निरंतर प्रदूषणरहित सेवा मिळेल. पश्चिम बंगाल, आसाम, आंध्रप्रदेश, ईशान्येची राज्ये, उत्तरप्रदेश किंवा बिहार असो तेथील सायकलरिक्षाचा वापर ई-वाहतुकीमुळे संपुष्टात येईल. हाताने रिक्षा ओढण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे गडकरी म्हणाले.

रिव्हर ग्रिड

पॉवर ग्रिडच्या धर्तीवर रिव्हर ग्रिड तयार केले जाणार असून ते इंटरस्टेट ट्रान्समिशन सिस्टीम अंतर्गत काम करेल. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, छत्तीसगढ, आंध्रप्रदेश, ओडिशा, झारखंड, गुजरात, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानात पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेक गावांमध्ये पिण्यायोग्य पाण्याचा अभाव आहे. दुसरीकडे बिहार आणि उत्तरप्रदेशात मोठय़ा प्रमाणात पूर येतो. या सर्व परस्परविरोधी स्थितीत पाण्याची गरज असणाऱया भागांमध्ये पाणी वळविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

Related posts: