|Monday, September 16, 2019
You are here: Home » क्रिडा » विश्व इलेव्हन संघाचे लाहोरमध्ये आगमन

विश्व इलेव्हन संघाचे लाहोरमध्ये आगमन 

वृत्तसंस्था/लाहोर

पाकिस्तानमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्वाला प्रारंभ होण्याची नांदी दिसत आहे. दरम्यान पाक आणि विश्व इलेव्हन यांच्यात टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. विश्व इलेव्हन संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेचा डु प्लेसिसकडे सोपविण्यात आले आहे. ही मालिका खेळण्यासाठी विश्व इलेव्हन संघाचे रविवारी पहाटे येथे आगमन झाले. त्यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

येथील इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर विश्व इलेव्हन संघाचे आगमन झाले. त्यावेळी विमानतळाच्या परिसरात सुरक्षा अधिकाऱयांची खूपच गर्दी दिसत होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत विश्व इलेव्हन संघाला विमानतळावरून एका अलिशान बसमधून पंचताराकित हॉटेलकडे नेण्यात आले. या मार्गावर सर्व बाजूने वाहतूक बंद करण्यात आली होती.

पाक आणि विश्व इलेव्हन यांच्यात टी-20 चे तीन सामने खेळविले जातील. गदाफी स्टेडियमवर या मालिकेतील हे सामने 12, 13, 15 सप्टेंबर रोजी खेळविले जातील. या मालिकेसाठी आयसीसीतर्फे सामनाधिकारी पाठविण्यात आला असून रिची रिचर्डसन हे या मालिकेवेळी निरीक्षक म्हणून राहतील.

विश्व इलेव्हन संघामध्ये डु प्लेसिस (कर्णधार), आमला, मिलर, इम्रान ताहीर, एम. मॉर्कल, जॉर्ज बेली, टीम पेनी, कटींग, तमिम इक्बाल, टी. परेरा, ग्रँट इलियॉट, पॉल कॉलिंगवूड, सॅमी, ब्रदी यांचा समावेश आहे.