|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चारित्र्याच्या संशयावरुन गळा चिरुन पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरुन गळा चिरुन पत्नीचा खून 

वार्ताहर / कसबा सांगाव

कसबा सांगाव ता. कागल येथे चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीच्या गळ्यावर विळ्याचे सपासप वार करत गळा चिरुन निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. सौ. वर्षा प्रल्हाद आवळे (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेने सांगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत घटनास्थळावरुन व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, प्रल्हाद आवळे (वय 45) हा सेंट्रींगचे काम करत होता. त्याला दारुचे व्यसन जडले होते. त्यामुळे नेहमी पत्नी वर्षा हिच्यावर चारित्र्याचा संशय घेत असे. यातून त्या दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे. 3 वर्षापूर्वी सततच्या त्रासाला कंटाळून वर्षा हिने मुलगी ऋतूजा (वय 16), रेश्मा (वय 12), श्रेया (वय 7) व मुलगा पवन (वय 11) या सर्वांना घेऊन माहेरी नांदणी ता. शिरोळ येथे गेली. याबाबत कुरुंदवाड पोलिसांत पती प्रल्हाद याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यामध्ये कुरुंदवाड पोलिसांनी पती-पत्नीमध्ये समेट घडवून आणत सुमारे एक वर्षापूर्वी कसबा सांगाव येथे नांदण्यास पाठविले होते. यानंतरही प्रल्हाद हा चारित्र्याच्या संशयावरुन वर्षा हिला शिवीगाळ करत मारहाण करायचा.

रविवार दि. 10 सप्टेंबर रोजी प्रल्हाद कामावर गेला नव्हता. सर्वजण घरी होते. रात्री 10 च्या सुमारास जेवण करुन सर्वजण झोपी गेले. बाहेरील खोलीत आजी-आजोबा, आतील खोलीत वडील प्रल्हाद व आई वर्षा तसेच रेश्मा, श्रेया व पवन  ही भावंडे झोपली होती. मात्र या पती-पत्नीत वाद सुरु झाला. पहाटे 3.30 च्या सुमारास दोघांच्यात कडाक्याचे भांडण चालू असल्याचे आजी विठाबाई हिने नात ऋतूजा यास सांगितले व कशासाठी वाद चालू आहे. ते पाहून येजा असे सांगितले. त्यानुसार ऋतूजा हिने आतील खोलीमध्ये पाहिले असता आतील खोलीमध्ये लाईट चालू असल्याचे दिसून आले. वडील प्रल्हाद हा आई वर्षा हिच्या डोक्याजवळ हातात विळा घेवून उभा असल्याचे दिसले. तर आई  वर्षा ही रडत व हुंदके देत असल्याचे आढळून आले. आईला पाहून ऋतूजाने आईला उठविण्याचा प्रयत्न केला. पण वडील प्रल्हाद याने आई वर्षाच्या हाताला धरुन उठविले व विळ्याने, हनगुटीवर, मानेवर  विळ्याने सपासप वार केले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. या घटनेने त्याठिकाणी झोपलेले बहिण भाऊ उठले व आरडा ओरडा सुरु केला.

आई वर्षा हिला बोलता येत नसल्याचे पाहून ऋतूजा हिने पाणी पाजण्याचा              प्रयत्न केला असता वडील प्रल्हाद याने जवळच पडलेला मोठा हातोडा स्वतःच्या डोक्यात मारुन घेतला. त्यामुळे डोक्यातून रक्त येवू लागले. तेही त्याठिकाणी बेशुध्दावस्थेत पडले होते. हातातील हातोडा काढून घेतला. यामुळे भयभीत झालेली लहान भावंडे दरवाजा उघडून आरडाओरडा करत बाहेर धावत आले. त्यामुळे इतर  सर्वजण बचावले. नाहीतर मोठा अर्थ घडला असता, असे पंचनाम्यामध्ये मुलगी ऋतूजाने सांगितले.

याबाबत कागल पोलीस ठाण्यात नोंद झाली असून प्रल्हाद यास पोलीसांनी अटक केली आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी भेट दिली. पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी कागल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

Related posts: