|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गौरी लंकेशच्या हत्येमागेही हिंदुत्ववादी गट?

गौरी लंकेशच्या हत्येमागेही हिंदुत्ववादी गट? 

पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या करण्याचा मोठा इतिहास आहे. समाजातल्या अनेक चुकीच्या गोष्टी, प्रथा त्यांना इतरांपेक्षा आधी दिसतात. हे त्यातलं वैशिष्टय़ आहे. ज्या गोष्टी दिसतात त्याबद्दल बोललं पाहिजे आणि लिहिलं पाहिजे. स्वाभाविकच प्रस्थापितांना ते आवडत नाही. त्याचा परिणाम, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर हल्ल्यात होतो.

अतिशय हुशारीने गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. सीसीटीव्हीवर पकडले जाऊ नये किंवा ओळखले जाऊ नये, याची पुरेशी काळजी हल्लेखोरानी घेतलेली. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्याचप्रमाणे गौरीदेखील विवेकवादी होत्या. विवेकवादी असल्याने गौरींचा कन्हैयाकुमार, जिग्नेश मेवाणीसारख्या कार्यकर्त्यांसोबत व डावी, दलित चळवळींशी जिव्हाळय़ाचे संबंध होते. वेगवेगळय़ा माओवादी गटाने एकत्र येऊन त्यांचा व्यापक जनाधार बनवावा, असं त्यांना मनापासून वाटत होतं. त्यांना जे वाटत असे, त्यासाठी त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करायच्या. भारतात वाढत्या धर्मांधतेबद्दल त्या चिंतित असायच्या. गौरी लंकेश पत्रिकेच्या माध्यमातून त्या आरएसएस व अन्य धर्मांध शक्तींवर हल्ला चढवायच्या. म्हणूनच हिंदुत्ववादी त्यांच्यावर नाराज होते.

त्यांच्या हत्यांनी भारतीय समाज अस्वस्थ झाला. देशभर पत्रकार व इतरांनी गौरीच्या हत्येचा निषेध केला. हत्येच्या विरोधात डाव्या विचाराचे नेते व कार्यकर्ते आणि पत्रकार त्यात सर्वांत पुढे होते. हत्येच्या काही मिनिटातच ही बातमी जगभर पसरली. नेहमीप्रमाणे, यावेळीदेखील आणखी किती हत्या पाहणार आहोत, असा प्रश्न सर्वांच्या मनात पडणं स्वाभाविक आहे. एखाद्या व्यक्तीची मते आवडली नाहीत तर त्याची हत्या करणं अमानवीय आणि लोकशाहीविरोधी तर आहेच परंतु ते फासीवादचं प्रतीकदेखील आहे. मी म्हणतो तेच खरं, असा अभिमानी विचार त्यामागे असतो. गौरी लंकेशच्या हत्येच्या विरोधात ज्याप्रमाणात आणि ज्या स्वरूपात बेंगळूर आणि कर्नाटकातल्या इतर शहरात पत्रकार आणि इतर मंडळी रस्त्यावर उतरली तो त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावा होता. कोणाचीही भीती न बाळगता निर्भयतेने त्या पत्रकारिता करायच्या.

गौरीच्या हत्येच्या काही दिवसापूर्वी गुरुमीत राम रहीम या हरियाणाच्या ढोंगी बाबाला बलात्काराच्या आरोपाखाली 20 वर्षाची शिक्षा न्यायालयाने दिलेली. तेव्हा लोकांना रामचंदर छत्रपती नावाच्या पत्रकाराची आठवण झाली. या ढोंगी बाबाच्या विरोधात सिरसात राहून तो मोहीम चालवायचा. त्याच्या जीवाला धोका होता पण तो घाबरला नाही. ‘पूरा सच’ नावाचं सायं दैनिक तो काढत असे. 15 वर्षापूर्वी म्हणजे 24 ऑक्टोबर 2002 रोजी त्याची हत्या करण्यात आली. एका लहानशा शहरातल्या पत्रकाराला 2002 साली जे दिसलं ते इतरांना दिसायला 15 वर्ष लागली. छत्रपतीला तेव्हा कोणाचीही फारशी मदत नव्हती. विविध पक्षाचे नेते तेव्हा ढोंगी बाबाच्या सेवेसाठी तत्पर असत. गेल्या महिन्याच्या तिसऱया आठवडय़ात हरियाणाच्या दोन मंत्र्यांनी ढोंगी बाबांच्या आश्रमात जाऊन त्यांना 51 लाख रु.चा सरकारी चेक दिलेला.

धर्म आणि ढोंगी बाबांचं प्रस्थ वाढत चाललं आहे. धर्म आणि जात याला पूर्वीपेक्षा अधिक महत्त्व मिळत आहे. अनेक ढोंगीबाबा सर्वत्र आढळतात. कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र…. देशातल्या प्रत्येक राज्यात ढोंगी बाबांचं साम्राज्य आढळतं. राज्यातले महत्त्वाचे नेते त्यांच्या ‘दर्शना’साठी जातात. या नेत्यांच्या भेटींमुळे ढोंगी बाबाना प्रति÷ा मिळते. यापूर्वी काही पत्रकारांनी अशा ढोंगी बाबांचा काही वेळा पर्दाफाश केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना तर नेहमीच ढोंगी बाबा आणि त्यांच्या चमत्काराचा पर्दाफाश करत असतात. मग, प्रस्थापितांकडून अशा पत्रकार, कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले जातात.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश विवेकवादाचा पुरस्कार करायचे. त्यातही धर्माचा राजकारणासाठी करण्यात येत असलेल्या दुरुपयोगाबद्दल ते बोलायचे. साहजिकच, धर्माचा राजकारणासाठी वापर करणाऱयांना त्यांची मते आवडत नसत आणि म्हणूनच चौघांची हत्या करण्यात आली. पहिल्या तिघांच्या हत्येत कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचे काहीजण सहभागी असल्याचं स्पष्ट झालं असून देखील मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. गौरीच्या हत्येमागेदेखील कुठला तरी कट्टर हिंदुत्ववादी गट असल्याचं सकृतदर्शनी दिसतं. चौकशीत अनेक गोष्टी बाहेर येतील. कर्नाटकात काँग्रेसचं सरकार असलं तरी गुन्हेगार पकडले जातील की नाही, अशी चर्चा आहे.

निखिल दधीच नावाचा सुरतचा एक व्यापारी आहे. त्यांनी एक ट्विट केलं आणि त्यात ‘एक कुत्री की मौत…’ असा उल्लेख गौरीच्या हत्येच्या संदर्भात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकूण 1,779 जणांना ट्विटरवर फोलो करतात. त्यात निखिल दधीचचापण समावेश आहे. गलिच्छ भाषेचा वापर करणाऱया आणि महिलांचा अपमान करणाऱया माणसाला पंतप्रधान फॉलो करतात, ही गोष्ट माझ्या दृष्टीने चिंतेची आहे. पंतप्रधानांनी आतापर्यंत त्याला अनफॉलो करायला पाहिजे होता, पण तसं झालेलं नाही. अशा माणसाला सत्तेतले लोक जेव्हा फॉलो करतात तेव्हा चुकीचा संदेश समाजात जात असतो. पंतप्रधान आणि सत्तेत असलेल्या इतरांनी आपण कोणाला फॉलो करत आहोत, याची काळजी घेतली पाहिजे. किमान एखाद्या व्यक्तीच्या हत्येबद्दल आनंद व्यक्त करणाऱयांना पंतप्रधानांनी फॉलो करता कामा नये.

कर्नाटकात जीवराज नावाचे भाजपचे एक आमदार आहेत. आधी मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. गौरीनी आरएसएसवर टीका केली नसती तर त्या जिवंत राहिल्या असत्या असं ते म्हणतात. याला काय म्हणावं? कशा प्रकारचा लोकप्रतिनिधी नसावा, याचं उदाहरण म्हणजे जीवराज. भारतीय संस्कृतीत मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये, असं सांगितलं जातं. अशी म्हण, योग्य आहे की अयोग्य, हा एक स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. पण मुद्दा हा आहे की भारतीय संस्कृतीचं सतत नाव घेणारेच त्या संस्कृतीच्या विरोधात कसे वागतात, हे त्याचं उदाहरण आहे.

ट्रोल हा काही जणांचा धंदा झाला आहे. काही महिन्यापूर्वी 19 वर्षाची गुरमेहर कौर नावाच्या दिल्लीच्या कॉलेजात शिकणाऱया मुलीनी भारत-पाकिस्तानात युद्ध होता कामा नये, असं फेसबुकवर पोस्टरच्या माध्यमातून सांगितल्यानंतर उजव्या आणि युद्धाच्या समर्थकांनी त्या तरुण मुलीला हैराण करून ठेवलं. वस्तुस्थिती ही आहे की गुरमेहर कौरचे वडील लष्करात होते आणि कारगीलच्या युद्धात ते शहीद झाले होते. भारताच्या राज्यघटनेने देशातल्या नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. परंतु गुरमेहर असो किंवा गौरी असो… सगळय़ांचा आवाज बंद करण्याचा आज प्रयत्न होताना आढळतो, गौरीची हत्या करण्यात आली परंतु हत्येतून विचाराची हत्या होत नसते. विचार पसरत जातो. महात्मा गांधीजींची हत्या 1948 साली करण्यात आली. परंतु त्यांचा विचार त्यातून संपला नाही. संपूर्ण जगात लोक म. गांधींच्या विचाराची आज अधिक आवश्यकता असल्याचं म्हणतात.

गौरीची हत्या केल्यामुळे समता आणि विवेकवादाचा तिचा विचार संपणार नाही. काही मूल्यं असतात आणि ते शाश्वत असतात. सत्य, अहिंसा, करुणा, प्रेम ही मूल्यं हत्येने संपत नसतात. लोकशाहीत वेगळे मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. असा अधिकार ज्या देशात हुकूमशाही असते, तिथे नसतो. भारतीय राज्यघटनेने तर हा मूलभूत अधिकारच दिला आहे. वेगळं मत मांडण्याचा अधिकार कायम राहिला पाहिजे. येणाऱया काळात याकरिता एक मोठा संघर्ष होणार, अशी चिन्हे दिसत आहेत. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्येची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. समाजाला अधिक असहिष्णू बनविण्याचा प्रयत्न चालला आहे पण तो यशस्वी होता कामा नये.

 

Related posts: