|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » वाहन परवान्यालाही आता ‘आधार’सक्ती

वाहन परवान्यालाही आता ‘आधार’सक्ती 

केंदीय सूचना व प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांची माहिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बनावट वाहन परवाने, परवान्याचा गैरवापर टाळण्यासाठी वाहन परवाना आणि आधार क्रमांक लिंक करण्याबाबत सरकार गांभिर्याने विचार करत असल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. येथे एका कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी याबाबत सुतोवाच केले. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर याची चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या विविध योजनांचा थेट लाभ घेण्यासाठी याआधीच शासनाने आधार क्रमांक बंधनकारक केला आहे. पॅन, बँक खाते, विमा, पीएफ, मतदान ओळखपत्र आदी 12 सेवांसाठीही आधार आवश्यक ठरवले आहे. त्यामध्ये आता वाहन परवान्याचीही भर पडणार आहे.

एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक परवाने असल्याच्या घटना उघड झाल्याने यातून गैरवापर होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास येऊ लागले आहे. त्यामुळे वाहन परवाना आधारला जोडण्याची सरकारची तयारी सुरु आहे. मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. अनेकदा अपघात व अन्य घटनानंतर परवाना रद्द होऊनही सदर व्यक्ती दुसऱया नावाने वाहन चालवत असल्याचे उघड झाले आहे. असे बनावट परवाने रोखण्यासाठी आधारचा आधार घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

तर फेब्रुवारी 2018 पर्यंत मोबाईल सीम आधारशी लिंक करावे लागणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. याबाबत कोणतीही सूट दिली जाणार नाही. एकाच व्यक्तीच्या नावाने वापरात असणारी प्रत्येक सीमकार्ड ही आधारशी जोडावी लागणार आहेत. त्यानंतर मात्र आधार लिंक नसणारी सीमकार्ड आपोआपच बंद होणार आहेत. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत आदेश दिले होते. तसेच 1 वर्षात सर्व मोबाईलधारकांची आधार ओळख पटवून घ्यावी, असे आदेशात म्हटले होते, याचीही आठवण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी करुन दिली.