|Monday, September 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्को शहरात वाहने पार्किंगमध्ये प्रचंड बेशिस्त, समस्येकडे दुर्लक्ष

वास्को शहरात वाहने पार्किंगमध्ये प्रचंड बेशिस्त, समस्येकडे दुर्लक्ष 

प्रतिनिधी / वास्को

वास्कोत वाहने पार्किंगमध्ये प्रचंड बेशिस्त माजलेली असून वाहन चालकांचा हा बेशिस्तपणा सर्वांनाच डोके दुखीचा प्रकार ठरलेला आहे. फुटपाथवर आणि भर रस्त्यावरसुध्दा वास्को शहरात वाहने ठेवली जात असून या बेशिस्तीवर वाहतुक पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. मात्र, पालिकेने सोमवारपासून पुन्हा बेशिस्त पार्किंगची वाहने उचलणार असल्याचे जाहीर केले आहे.

वास्को शहरात सध्या कधी नव्हती ऐवढी पार्किंगमध्ये बेशिस्त माजलेली असून या बेशिस्त पार्किंगचा त्रास पादचाऱयांबरोबरच इतर वाहने आणि सर्वांनाच होऊ लागलेला आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहने वाट्टेल तीथे पार्क करण्याचे प्रकार प्रचंड वाढलेले आहेत. कुणी कुठेही आणि कसेही वाहन पार्क केले तरी सध्या कुणीच कुणाला विचारीत नाही. फुटपाथ वाहने पार्क करून पादचाऱयाची वाट अडवण्याचे पार्क तर नित्त्याचेच झालेले आहेत. चुकीच्या जागी वाहने पार्क करणे, वेडी वाकडी पार्क करणे आणि रस्त्यावरच वाहनें पार्क करून सर्वानाच वेठीस धरण्याचेही प्रकार वाढलेले आहेत. अशा प्रकारांमुळे शहरात बेशिस्त माजलेली असून शहरातील स्वातंत्रपथ मार्ग,  एफ.एल.गोम्स मार्ग, पालिका इमारती सभोवतालचा परीसर, पालिका मार्केट, व इतर महत्वाच्या ठिकाणी बेशिस्त प्रकार सर्रास दिसून येतात. वाहतुक पोलीस आपली सर्व शक्ती विना हेल्मेट चालकांना पकडण्यातच खर्ची घालत असल्याने बेशिस्तपणे वाहने चालवणे आणि त्याच बेशिस्तीने वाटेल तीथे वाहने पार्क करून लोकांना त्रस्त करणाऱयांचे आयतेच फावलेले आहे.

साधारण दीड वर्षापूर्वी वास्को शहरात वाहतूक पोलीस व मुरगाव पालिका बेशिस्त पार्किंगविरुद्ध संयुक्तरीत्या कारवाई करीत होते. चुकीच्या जागी पार्क केलेली वाहने उचलण्यात येत होती. या कारवाईसाठी पालिकेनेच स्वातंत्र वाहन उपलब्ध केले होते. मात्र, ही कारवाई खंडित झाल्यानंतर हळूहळू बेशिस्त वातावरण पूर्वपदावर आले. आज बेशिस्तीचा अतिरेक झालेला आहे.

सोमवारपासून बेशिस्तीविरुद्ध पुन्हा कारवाई

ती कारवाई खंडित केल्यासंबंधी मुरगावच्या नगराध्यक्षांना विचार असते येत्या सोमवारपासून बेशिस्तपणे पार्क केलेली वाहने उचलण्याची कारवाई पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात बेशिस्तपणे वाहने पार्किंग समस्या गंभीर असल्याची दखल पालिकेने घेतलेली असून यासंबंधी नुकतीच बैठक होऊन वाहने उचलण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असल्याची माहिती नगराध्यक्ष दीपक नाईक यांनी दिली. या कारवाईसाठी पालिकेने उपलब्ध केलेले वाहन नादुरुस्त ठरल्याने ही कारवाई खंडित करण्यात आली होती. आता बेशिस्त पार्किंगविरुद्ध सोमवारपासून कारवाई सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.