|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘यंत्रमाग व्यवसायाच्या प्रस्तावीत सवलती सर्वांना मिळाव्यात’

‘यंत्रमाग व्यवसायाच्या प्रस्तावीत सवलती सर्वांना मिळाव्यात’ 

प्रतिनिधी/ विटा

यंत्रमाग व्यावसायिकांना वीज दरात एक रूपया सवलत आणि पाच टक्के अनुदान मंजुरीसाठी मंत्रीमंडळाकडे सादर करावयाच्या प्रस्तावातील भेदभाव दूर करावा. या दोन्ही सवलती 27 अश्वशक्ती पेक्षा जास्त जोडभार साध्या आणि स्वयंचलित व्यावसियकांनाही लागू करण्यात याव्यात, अशी मागणी विटा यंत्रमाग औद्योगीक सहकारी संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांना दिल्याचे संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी सांगितले.

याबाबत किरण तारळेकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, इचलकरंजी येथे 27 ऑगस्ट 2016 रोजी वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी, विविध यंत्रमाग संघटनांच्या समवेत वस्त्रोद्योग परिसंवाद झाला. आर्थिक अडचणीत सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला तातडीचा दिलासा मिळावा, अशी मागणी यंत्रमागधारकांनी केली होती. यावेळी राज्य शासन बँक कर्जावरील व्याजात 5 टक्के परतावा अनुदान देईल आणि वीज दरात 1 रूपयाची सवलत या दोन्ही गोष्टी तातडीने लागू करेल, अशी घोषणा वस्त्रोद्योग मंत्र्यांनी केली होती. या सवलती जुलै 2016 पासून लागू करण्यात येतील, असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते.

याबाबत गेल्या वर्षभरात अनेक वेळा शासनस्तरावर चर्चा झाल्या. राज्य शासनाच्यावतीने दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात येत होते. या पार्श्वभूमिवर खासदार राजू शेट्टी यांनी 30 मे 2017 रोजी या दोन्ही सवलतीबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, असे पत्र दिले होते. त्यावर याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्याची तयारी सुरू असल्याचे शासनाने कळविले होते. मात्र या प्रस्तावात या सवलती 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या साध्या यंत्रमागधारकांनाच मिळतील, असे नमूद केले आहे. मुळातच गेल्या दोन वर्षातील मंदीचा फटका जवळपास सर्वच यंत्रमागधारकांना बसलेला आहे. त्यामुळे सवलती देताना शासनाने दुजाभाव न करता सर्व यंत्रमाग धारकांचा सवलत योजनेत समावेश करावा, अशी मागणी तारळेकर यांनी निवेदनात केली आहे.

 

 

Related posts: