|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस

राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस 

प्रतिनिधी/ पणजी

राजधानी पणजीसह राज्यात सर्वत्र शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. शनिवारी दुपारपासून सर्वच ठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी प्राप्त झाली आहे.

गेले कित्येक दिवस गायब झालेल्या पावसाने गुरुवारपासून गोव्यात सर्वत्र आपले अस्तित्व दाखविण्यास प्रारंभ केला आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरु झालेला पाऊस शनिवारी पहाटेपर्यंत सर्वत्र चालू होता. या पावसामुळे राज्यातील धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तसेच अनेक भागात पावसाअभावी सुकलेल्या  शेतीला हा पाऊस पुरक ठरला आहे. शेतीसाठी हा पाऊस संजीवनी ठरला आहे.

गेल्या 24 तासात सर्वाधिक अडीच इंच पाऊस हा जुने गोवेमध्ये पडलेला आहे. म्हापसामध्ये दोन इंच, पेडणेमध्ये दीड इंच, फोंडय़ामध्ये जवळपास दोन इंच, पणजीत दीड इंच, सांखळीत एक इंच, वाळपईत अर्धा इंच, काणकोणमध्ये एस सेमी, दोबोळीत जवळपास दोन इंच, सांगे व केपेमध्ये तुरळक पाऊस पडल्याचे वृत्त आहे.

आगामी 24 तासात राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे तर दि. 21 रोजी सर्वत्र मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पणजीत आतापर्यंत 78 इंच पावसाची नोंद झाली असून राज्यात यावर्षी पाऊस जरी कमी पडलेला असला तरी पुढील सात – आठ दिवसांत जोरदार पाऊस झाला तर 30 सप्टेंबरपर्यंत सर्व अनुशेष भरुन काढील व सरासरी एवढाच याही वर्षी पाऊस पडेल असा अंदाज आहे.

सध्या सुमारे 23 इंच पाऊस कमी झालेला असला तरी यावर्षीचा पाऊस तसा समाधानकारक आहे. सरासरीच्या तुलनेत तो कमी असला तरी राज्यातील सर्व धरणे भरलेली आहेत. शेती आणि बागायती तसेच काजू उत्पादनावर नेमका कोणता परिणाम होईल, याचे भाकित सध्या करता येत नाही. मात्र पुढील 10 दिवस तरी मध्यम तथा जोरदार पाऊस पडून पाण्याची गरज आहे.