|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मोदी शासन काळात देशात सर्वाधिक शेतकऱयांच्या आत्महत्त्या

मोदी शासन काळात देशात सर्वाधिक शेतकऱयांच्या आत्महत्त्या 

प्रतिनिधी/ मिरज

देशाच्या इतिहासात सर्वाधिक शेतकऱयांच्या आत्महत्त्या नरेंद्र मोदी शासनाच्या कालावधीत झाल्या. आजही महिला आणि मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. म्हैसाळ स्त्रीभ्रूण हत्त्या प्रकरणाने सांगली जिह्याच्या सांस्कृतिक परंपरेला काळीमा फासला. तर कोपर्डीची घटना राज्यासाठी लाजिरवाणी आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटमध्ये ‘जागर जाणिवांचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खासदार सुळे यांनी महाविद्यालयाच्या युवक-युवतींशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईतर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंबाबाई तालिम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, व्यवस्थापकीय संचालक सुमंत कुलकर्णी, संजय बजाज, सौ. विनया पाटील, डॉ. ए. सी. भगली, शेडजी मोहिते, सागर घोडके, बाळासाहेब होनमोरे, योगेंद्र थोरात, सौ. आरती भोकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘अब अच्छे दिन आयेंगे’ असे आश्वासन देऊन मोदी शासन सत्तारुढ झाले. गेल्या तीन वर्षात अनेक भुलथापा देऊन या शासनाने दिल्लीपासून गल्लीपर्यंतची सत्ता हस्तगत केली. पण याच शासनाच्या कालावधीत देशाच्या इतिहासात कधीही झाल्या नव्हत्या इतक्या शेतकऱयांच्या आत्महत्या झाल्या. तीन वर्षात शेतकऱयांच्या तिप्पट आत्महत्या ही केवळ शासनाची जबाबदारी आहे. शेतकऱयांना संपूर्ण कर्जमाफी हा त्यावरचा एकमेव उपाय आहे. पण भाजपाचे हे शासन कर्जमाफीची घोषणा करुन त्यामध्येही पळवाटा शोधते आहे, असा आरोप केला.

सध्या महाराष्ट्रातील महिला आणि मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. म्हैसाळमधील स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणाने तर सांगली जिह्याच्या सांस्कृतिक परंपरेला काळीमा फासला आहे. कोपर्डीची घटना राज्यात लाजिरवाणी ठरली. अशा घटना टाळण्यासाठी सामाजिक परिवर्तन होणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी पक्षविरहित सामाजिक चळवळ उभी केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. पोलिसांच्या कामावर आमचा विश्वास आहे. कोपर्डी अथवा म्हैसाळ सारख्या घटनांमध्ये ते निश्चितच आरोपींची गय करणार नाहीत. सदरचे प्रकरण लवकरात निकालात लागावे, अशी अपेक्षा आहे. पण त्याचे कोणी राजकीय भांडवल करु नये, असा सुचक इशाराही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

सत्तेच्या राजकारणात मला कधीही मोह नव्हता व नाही. सत्तेत नसतानाही समाजासाठी खूप काही करता येते. आणि ते आम्ही करुन दाखविले आहे. राजकारणात सत्ता येते आणि जाते. मात्र, समाजाचे आपण काही देणे आहोत, या जाणीवेतून काम करीत राहिल्यास आपण बरेच काही करु शकतो, असेही त्या म्हणाल्या. राजकारणातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही आहे, हे खरे आहे. मात्र घराणेशाहीमुळे राजकारणात थेट प्रवेश मिळाला तरी प्रत्येकाला आपले कर्तव्य सिध्द करावेच लागते, असेही त्या म्हणाल्या.

शिक्षण क्षेत्राचा या शासनाने खेळखंडोबा केला असून, यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप केला. सध्या ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपतीपर्यंत सर्व सत्तास्थाने भाजपाच्या हाती असूनही देशातील जनता सुखी व समाधानी नाही, हेच या शासनाचे फार मोठे अपयश असल्याचा दावाही त्यांनी केला. आज देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, भाजीपाला यासह सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने केवळ कागदावर राहिली आहेत. त्यामुळे युवापिढी या शासनावर नाराज असून, त्यांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच राज्यात महागाई विरोधात रस्त्यावर उतरेल.

सांगली जिह्याबाबत बोलताना त्यांनी, सांगली आणि सातारा जिह्याने सहकार चळवळ देशात रुजविली. स्व. वसंतदादा पाटील हे जिह्याचेच नव्हे तर राज्याचे भुषण होते. येणाऱया प्रत्येक अडचणींवर मात करुन कष्टाने आपले ध्येय साध्य करण्यात सांगलीकर माहिर आहेत, असेही त्या म्हणाल्या. याचवेळी जिह्यातील राष्ट्रवादीच्या पडझडीबाबत खासदार सुळे यांनी आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल, असा दावा केला. सध्या जिह्यात भाजपाचे म्हणून जे दिसतात, ते मुळचे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यांचाही भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे तेही स्वगृही परततील माजी मुख्यमंत्री नारायण राणेंबाबत त्यांनी, ज्येष्ठ नेते असून त्यांच्याबद्दल आदर असल्याचे सांगत त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related posts: