|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आदर्श शिक्षकच आदर्श समाज घडवितात

आदर्श शिक्षकच आदर्श समाज घडवितात 

दीपक केसरकर यांचे प्रतिपादन : पाटील परिवार-बेळगावकरांतर्फे लीला पाटील यांचा हृद्य सत्कार

प्रतिनिधी /बेळगाव

आदर्श शिक्षकच आदर्श समाज घडवितात. बेळगावातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लीला पाटील यांचे कौतुक आहे. त्यांचे पती टी. के. पाटील यांच्या स्नेहामुळेच हवामान प्रतिकुल असतानाही बेळगावला येवून पोहोचलो. त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा, असे उद्गार महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काढले.

पाटील परिवार तसेच बेळगावकरांच्यावतीने बुधवारी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त लीला पाटील यांच्या नागरी सत्काराचे आयोजन येथील लोकमान्य रंगमंदिर येथे करण्यात आले होते. व्यासपीठावर ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर, अध्यक्षस्थानी महापौर संज्योत बांदेकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर आणि लीला पाटील यांचे पती व शहर म. ए. समितीचे उपाध्यक्ष टी. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. ‘तरुण भारत’चे व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांनी स्वागत केले. किरण ठाकुर व महापौर संज्योत बांदेकर यांचा पाटील परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. तरुण भारत व लोकमान्य परिवारच्यावतीने किरण ठाकुर यांनी लीला पाटील व टी. के. पाटील यांचा विशेष सन्मान केला. यानंतर दीपक केसरकर यांचा सन्मान किरण ठाकुर यांनी केला. मान्यवरांच्या हस्ते लीला पाटील यांचा भव्य नागरी सन्मान करण्यात आला. यामध्ये शाल, सरस्वतीची प्रतिमा व पुष्पगुच्छ आदींचा समावेश होता.

किरण ठाकुर यांनी पारंपरिक काळापासून असलेले शिक्षणाचे महत्त्व यावेळी आधोरेखित केले. विविध देशात शिक्षणाच्या तसेच श्रम आणि बुद्धीशक्तीच्या समन्वयाने विकास झाला. अमेरिका हा तसा निर्वासितांचा देश. मात्र तेथेही सर्वांच्या मेहनतीचे चीज झाले आहे, असे त्यांनी सांगितले. लीला पाटील या चित्रकलेच्या शिक्षिका आहेत. चित्रकला हे जगण्याचे शास्त्र आहे. आज चांगले शिक्षक निर्माण करणाऱया संस्था उदयाला आल्या पाहिजेत. आपण कायम विद्यार्थी म्हणून जगलो तर सामर्थ्यवान बनू शकतो. या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बेळगाव केंदशासित करा

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर सीमावासियांची व्यथा किरण ठाकुर यांनी मांडली. जोवर सीमाप्रश्न सुटत नाही तोवर हा भाग केंद्रशासित करा अशी मागणी आहे. आम्ही राष्ट्रीय विचारांचे आहोत. घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली कर्नाटक सरकार करत आहे. असे सरकार ताबडतोब बरखास्त करण्याचा अधिकार लोकशाहीने केंद्राला दिला आहे. अशी मागणी केली की आमच्यावर राष्ट्रद्रोह होतो. कानडी गुंडांना मात्र संरक्षण मिळते. अशावेळी महाराष्ट्र कमी पडतोय अशी आमची भावना झाली आहे. यासाठी महाराष्ट्राने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आजच्या तरुण पिढीला सीमाप्रश्न समजण्याची गरज आहे. जुन्या पिढीने वेगवेगळे सत्याग्रह आणि साराबंदीच्या माध्यमातून रक्त सांडलं आहे. भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आमचे पुढारी राबले. आज टी. के. पाटील तसेच इतरांवर तरुण पिढीला जागृत करण्याची जबाबदारी आहे, असे किरण ठाकुर यावेळी म्हणाले.

सत्कारमूर्ती लीला पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महापौर संज्योत बांदेकर यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर अश्विनी पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विनायक जाधव यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन लीला पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

सीमाप्रश्नासाठी महाराष्ट्राच्यावतीने ठोस भूमिका घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सीमाभागात 14 वर्षे राहणाऱयांना महाराष्ट्राकडून अनेक सुविधा मिळतात. त्यासाठीचे खाते सध्या अडगळीत आहे. किरण ठाकुर आणि आपण स्वतः यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून हा विभाग मंत्रालयात हलविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती यावेळी दीपक केसरकर यांनी दिली.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विधानसभा आणि मनपा सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांतील जागा वाढणे गरजेचे आहे. मराठी माणसाचा पराभव मराठी माणूसच करू शकतो, यासाठी येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य निवडून देऊन लोकशाहीत आपला लोकेच्छेचा आरसा दाखविण्याची गरज आहे. यासाठी एकीची वज्रमूठ आवळा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

Related posts: