|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आरुषीचा खुनी कोण ?

आरुषीचा खुनी कोण ? 

नऊ वर्षांपूर्वी गाजलेल्या दिल्लीनजीकच्या गाझियाबाद येथील आरुषी तलवार हत्याकांडात अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपी मातापित्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालाने अनेकांना आश्चर्य वाटणार यात संशय नाही. कारण कनिष्ठ सीबीआय न्यायालयात आरुषी आणि तिच्या घरातील नोकर हेमराज यांच्या हत्येसाठी तिच्याच मातापित्यांना जबाबदार धरण्यात आले होते. तसेच त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या निकालाविरोधात त्यांनी अपील केले होते. ते मान्य करण्यात येऊन आता त्यांची आरोपातून मुक्तता झाली आहे. या दोन्ही निकालांबद्दल आता बरीच उलटसुलट चर्चा होत राहणार हे निश्चित आहे. हे प्रकरण 9 वर्षांपूर्वीचे असल्याने त्याची थोडी उजळणी करणे आवश्यक आहे. 2008 मध्ये गाझियाबाद येथील रहिवासी आणि प्रथितयश दंतवैद्य दांपत्य राजेश तलवार आणि नुपूर तलवार यांची कन्या 15 वर्षांची आरुषी हिचा खून करण्यात आला होता. हा खून त्यांच्या घरात काम करणारा नोकर हेमराज याने केला, असा प्रारंभी संशय होता. तथापि, हेमराजचाही मृतदेह आढळून आल्याने या दोन्ही हत्या कोणी केल्या याचे गूढ निर्माण झाले होते. तलवार कुटुंबीयांच्या इतर काही नोकरांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. प्रथम स्थानिक पोलिसांनी याच दिशेने तपास केला होता. हत्या झाल्यानंतर ती घडलेल्या ठिकाणी कोणीतही बराच बदल करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट झाले होते. नोकरांच्या चौकशीतून काही निष्पन्न न झाल्याने पुढे हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले. सीबीआयचाही प्रथमदर्शनी संशय नोकरांवरच होता. तथापि, त्यांच्या नार्को चाचणीतूनही काही धागेदोरे न सापडल्याने आरुषीच्या मातापित्यांवरच संशय बळावला. पुढे त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरच या दुहेरी खुनाचा आरोप ठेवण्यात आला. सीबीआयच्या न्यायालयात खटला चालल्यानंतर आरोप सिद्ध झाल्याचे सांगण्यात आले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांच्या विरोधात थेट पुरावा नव्हता. तथापि, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे 26 कारणे देऊन त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. परिणामी या प्रकरणाचे गूढ उकलले, असे त्यावेळी वाटले होते. मात्र, निकालातील अनेक मुद्दय़ांना आक्षेप घेत तलवार दांपत्याने अलाहाबाद उच्च न्यायालयात अपील केले. त्यात त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. कनिष्ठ न्यायालयाने पुराव्यांचा जो अर्थ लावला तो अयोग्य असल्याचे मतप्रदर्शन उच्च न्यायालयाने केले आहे. आपल्याला उच्च न्यायालयात न्याय मिळाला, अशी भावना तलवार दांपत्याने व्यक्त केली, तर सीबीआय या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या प्रकरणातील नाटय़ अद्यापही संपुष्टात आले असे म्हणता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल येईपर्यंत हे गूढ कायम राहील. हे प्रकरण जरी एका कुटुंबाशी संबंधित असले, तरी त्यातून बरेच सामाजिक आणि न्याय प्रक्रियासंबंधी प्रश्नही निर्माण होतात. कनिष्ठ न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयात पूर्णतः रद्द होते आणि संशयाचा फायदा आरोपींना दिला जातो, ही बाब अनेकांना विस्मयकारक वाटल्याखेरीज राहणार नाही. घटना, पुरावे आणि कायदा या तिन्ही बाबी त्याच असताना निकालात एवढा फरक कसा हा प्रश्न चर्चेत राहणार हे उघड आहे. अर्थात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हाच आता ग्राहय़ मानला जाईल. तसेच सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेले आणि तेथे निकाल बदलला गेला नाही, तर तो कायम होईल. या निकालाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे यासंबंधी दुमत नाही. तसेच तपास यंत्रणांनी प्रकरणाचे संशोधन योग्य प्रकारे केले होते की नाही, यावरही आता बराच खल होणार आहे. अद्याप या प्रकरणाचा पूर्ण निकाल प्रसिद्ध झालेला नाही. त्यात तपासावर प्रश्नचिन्ह उमटविले असेल तर ते तपास यंत्रणांच्या दृष्टीने अधिक गंभीर ठरेल. या प्रकरणातून जे सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत, त्यांचाही गंभीरपणे विचार होणे आवश्यक आहे. एकच मूल असणारी कुटुंबे, त्यांच्या समस्या, करियरच्या मागे लागलेले आईवडील आणि त्यामुळे मुलांकडे होणारे त्यांचे दुर्लक्ष, आपल्या पाठीमागे मुले कोणाच्या संपर्कात असतात आणि काय करतात, ती उमलत्या वयात असताना त्यांची दिशा भरकटते आहे काय, इत्यादी बाबी तपासण्याची आवश्यकता अशा अनेक मुद्दय़ांना या प्रकरणामुळे उजाळा मिळाला आहे. छोटे कुटुंब, सुखी कुटुंब असे म्हणण्याचा प्रघात असला तरी प्रत्येक वेळी अशीच स्थिती असेल असे नाही. कुटुंबाचा आकार किती, यापेक्षा त्यातील सदस्यांचे परस्परांशी संबंध कसे आहेत यावर त्याचे स्वास्थ्य अवलंबून असते ही बाब यातून अधोरेखित होते. आपल्या आयुष्यातील घडामोडी आपल्या आईवडिलांपासून लपवाव्यात असे मुलांना वाटू नये, इतके मोकळे वातावरण ठेवण्याची जबाबदारी प्रामुख्याने आईवडिलांची असते. अशा निकोप वातावरणात अशा घटना घडण्याची शक्यता कमीत कमी असते. आरुषी प्रकरणात नेमके काय घडले, की ज्याचे पर्यवसान तिच्या हत्येत झाले, ही बाब कालांतराने स्पष्ट होईलच. न्यायालयाच्या निकालातही त्यावर प्रकाश टाकण्यात आला असेल. तरीही हे मुद्दे महत्त्वाचे आहेत, आणि त्यावर प्रकर्षाने विचार होण्याची आवश्यकता आहे. सध्या या प्रकरणातील मुख्य प्रश्न आरुषीचा खुनी नेमका कोण हा आहे. त्याचे उत्तर शोधण्यासाठी आता तपास यंत्रणांना पुन्हा कंबर कसावी लागेल, असे दिसते. कारण या प्रकरणाची फाईल बंद झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या निकालामुळे ती पुन्हा उघडली गेली आहे. परिणामी या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा लागणार आहे. तपास यंत्रणांसमोर हे आव्हान असून त्यांनी ते योग्यपणे पेलल्यास आणि खरा खुनी न्यायासनासमोर आणल्यास या यंत्रणांवरचा विश्वास वाढण्यास साहाय्य होईल. अन्यथा या प्रकरणाची नोंद इतिहासात ‘अनसॉल्व्हड मिस्ट्री’ अशी होईल. ती तशी होणे एकंदर समाजहिताच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही.

Related posts: