|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » बाजार घसरत बंद

बाजार घसरत बंद 

बीएसईचा सेन्सेक्स 24, एनएसईचा निफ्टी 23 अंशाने कमजोर

वृत्तसंस्था/ मुंबई

दिवाळी सण असल्याने भांडवली बाजारात तेजीची अपेक्षा करण्यात येत होती. मात्र बुधवारच्या सत्रात भांडवली बाजार घसरत बंद झाले. सप्ताहातील शेवटचे सत्र असल्याने बँक समभागात दबाव आला होता. ऍक्सिस बँकेने सप्टेंबर तिमाहीचा निकाल प्रसिद्ध केला असून त्यात असमाधानकारक कामगिरीने बँकेचा समभाग 10 टक्क्यांपर्यंत घसरला.

निफ्टीमधील एफएमसीजी निर्देशांक वगळता सर्वांमध्ये घसरण झाली. बँक निफ्टी 1.35 टक्क्यांनी घसरला. वाहन निर्देशांक 0.48 टक्के, अर्थसेवा निर्देशांक 0.98 टक्के, आयटी 0.30, मीडिया 0.55 टक्के, धातू 0.37 टक्के, औषध निर्देशांक 1.21, पीएसयू बँक 2.49 टक्के, खासगी बँक 1.62 टक्क्यांनी घसरला.

बीएसईचा सेन्सेक्स 24 अंशाच्या घसरणीने 32,584 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 23 अंशाने घसरत 10,210 वर स्थिरावला. निफ्टी निर्देशांक 10,200 च्या टप्प्यावर कायम राहिला आहे.

बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.01 टक्क्यांनी वधारत बंद झाला. आयजीएल, टोरेन्ट फार्मा, अदानी एन्टरप्रायजेस, वर्लपूल, इंडियन हॉटेल, पेट्रोनेट, अशोक लेलँड, एमआरपीएल, बीईएल, वक्रांगी, कोलगेट आणि यूबीएल 4.95-1.17 टक्क्यांनी वधारले. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.02 टक्क्यांनी घसरला. लायकॉस इन्टरनेट, देना बँक, इंडोको रेमिडिज, टायगर लॉजिस्टिक्स, टीव्ही व्हिजन 9.47-4.99 टक्क्यांनी मजबूत झाले.

दिग्गज समभागांची कामगिरी

रिलायन्स, पॉवरग्रिड, विप्रो, कोटक महिंद्रा बँक, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब, 2.36-0.38 टक्क्यांनी वधारले. ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय, सिप्ला, एसबीआय, ल्युपिन, सन फार्मा, हिंदुस्थान युनि, एशियन पेन्ट्स, बजाज ऑटो, हीरो मोटो, मारुती सुझुकी 8.24-0.76 टक्क्यांनी घसरले.

डाओ जोन्सची विक्रमी पातळीवर

चांगले निकाल लागल्याने अमेरिकन बाजारात तेजी आली. अमेरिकेचा डाओ जोंस 40 अंशाने वधारत 22,997 वर बंद झाला. डाओ जोंसने पहिल्यांदाच 23,000चा टप्पा पार केला. 2 ऑगस्टपासून यामध्ये 1,000 अंशाची तेजी आली आहे. एका वर्षात अमेरिकेचा बाजार 25 टक्क्यांनी वधारला आहे.