|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पीडीए पुनर्रचना प्रस्तावामुळे राजकीय क्षेत्रात अस्वस्थता

पीडीए पुनर्रचना प्रस्तावामुळे राजकीय क्षेत्रात अस्वस्थता 

बाबुशसाठी सरकारचा खटाटोप चालल्याचा आरोप

प्रतिनिधी/ पणजी

उत्तर गोवा पीडीएच्या पुनर्रचनेच्या प्रस्तावामुळे भाजप व मगो पक्षातही अस्वस्थता पसरली आहे. नव्याने किनारी पीडीएची स्थापना केली जात असून त्यात बाबुश मोन्सेरात यांची अध्यक्षपदी वर्णी लावली जाणार आहे. याविषयी उत्तर गोवा पीडीएचे अध्यक्ष उपसभापती मायकल लोबो यांनी राज्यातील जनतेला दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन सरकारला केले आहे.

राज्यात आणखी एका पीडीएची स्थापना केली जात असून सध्याच्या उत्तर गोवा पीडीएचे विभाजन करण्यात येईल. त्यातून किनारी पीडीएची स्थापना होईल. उत्तर गोवा पीडीए तशीच राहिल. त्यात पणजी, ताळगावसह संपूर्ण तिसवाडी व बार्देश तालुक्याचा समावेश होणार आहे. मात्र त्यातून कळंगूट, कांदोळी, सिकेरी, बागा, हणजुणे, कायसूव इत्यादी भागाला वगळले जाईल. त्यांच्यासाठी स्वतंत्र किनारी पीडीएची स्थापना केली जात आहे. सध्या यासंबंधीच्या हालचाली सुरु असल्याने  राजकीय क्षेत्रात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी आपण आताच काही बोलणार नाही, असे सांगून नाराजी व्यक्त केली.

आम्ही जनतेला काय उत्तर देणार : लोबो

उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले की जनतेचे हीत, गोय, गोयकारपण सांभाळायचे असेल आणि त्यात हेतू शुद्ध असेल तर आणखी 4 ते 8 पीडीए कराव्यात, काही समस्या नाही. मात्र राजकीय परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठी जर अशा पद्धतीने पीडीए स्थापन करीत असाल तर ते योग्य ठरणार नाही. जनतेला आम्ही कोणते उत्तर देणार? असा सवालही त्यांनी केला.

अध्यक्षपद गेल्यास काही फरक पडणार नाही

आपले पंख छाटण्याचा कोणी प्रयत्न केला त्याबद्दल आपल्याला दुःख वाटत नाही. परंतु जनतेला दुखावण्याचा प्रयत्न करू नका, असे लोबो म्हणाले. सध्या उत्तर गोवा पीडीएतर्फे आम्ही किनारी भागाचेदेखील योग्य पद्धतीने व्यवस्थापन करतोय. आपल्याकडील अध्यक्षपद काढून घेतले तरीही आपल्याला फरक पडत नाही. आपण अध्यक्षपदासाठी हपापलेलो नाही. मात्र जनतेने निवडणुकीतून घरी बसविलेल्या एखाद्या व्यक्तीला मागील दाराने आणून जागृत करता ही गोष्ट पटण्यासारखी नाही, असे लोबो पुढे म्हणाले.

भाजपातही मोठे वादळ सुरु

भारतीय जनता पार्टीमध्ये देखील पीडीएच्या विभाजनपदावरून तसेच बाबुश मोन्सेरात यांची अध्यक्षपदी वर्णी लावण्याच्या प्रश्नावरून मोठे वादळ सुरू झाले आहे. पक्षांतर्गत जोरदार विरोध सुरू झाला असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पक्षांतर्गत असलेला विरोध फेटाळून मोन्सेरात यांची अध्यक्षपदी वर्णी लावणार काय! हे पहावे लागेल.

 

Related posts: