|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चालक टेम्पोतच अत्यवस्थ स्थितीत

चालक टेम्पोतच अत्यवस्थ स्थितीत 

कोल्हापूर कागल येथील ट्रकचालक

प्रतिनिधी / मालवण:

 कोल्हापूर जिल्हय़ातील कागल येथील ट्रकचालक रवींद्र नामदेव पाटील (35) हा अत्यवस्थ स्थितीत आयशर टेम्पोत सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाटील याला उपचारासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ही घटना गुरुवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली. पाटील याची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिता गावकर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले.

कोल्हापूर येथून आयशर टेम्पोमधून तारकर्ली येथे सामान घेऊन रवींद्र पाटील हा चालक आला होता. पाटील याच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने तो ट्रकमध्येच पडून होता. परिसरातील नागरिकांनी याबाबत मालवण पोलीस कर्मचारी संतोष गलोले यांना माहिती दिली. गलोले यांनी तातडीने 108 रुग्णवाहिकेला कॉल करून कल्पना दिली. तातडीने पाटील याला 108 मधून मालवण ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. पाटील याच्याकडे असलेल्या कागदपत्रांतून त्याच्याविसयी माहिती मिळाली. रुग्णालय प्रशासनाने याबाबत तातडीने त्याच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला कळविले. डॉ. गावकर यांनी पाटील याच्या प्रकृतीची तपासणी केली असता गंभीर आजारी असल्याने त्यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्याच्या सूचना केल्या.

पोलिसांनी टेम्पो मालकाशी संपर्क साधून त्याला त्याला तातडीने मालवणात बोलावले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्लेकर करत आहेत.

कर्मचारी ठरले तारणहार

पाटील याची प्रकृती गंभीर असल्याने आणि त्याच्यासोबत कोणीही नातेवाईक नसल्याने डॉ. गावकर यांनी रुणालयाचा एक कर्मचारी त्याच्यासोबत जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. पाटील याच्या कुटुंबियांचाही शोध ग्रामीण रुग्णालयाकडून घेण्यात आला आहे. तसेच ट्रकमालकालाही कल्पना देण्यात आली आहे. त्यामुळे पाटील याच्यासाठी रुग्णालय प्रशासन तारणहार ठरले.