|Monday, August 26, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » डिजिटल शिक्षणामुळे मुलांच्या इंग्रजीतील आकलनशक्तीत वाढ

डिजिटल शिक्षणामुळे मुलांच्या इंग्रजीतील आकलनशक्तीत वाढ 

पुणे / प्रतिनिधी :

डिजिटाईज शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयाच्या वाचन व आकलनशक्तीत मोठी सुधारणा होत असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

‘इंग्लिश हेल्पर’द्वारे राईड टू रीड या उपक्रमांतर्गत विविध शासकीय व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मूल्यांकन करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान प्रवण गोष्टींच्या माध्यमातून वाचण्याचा अनुभव घेतला, त्यांना ट्रीटमेंट ग्रुप असे संबोधण्यात आले, तर ज्यांना इंग्रजी शिकण्यासाठी तंत्रज्ञानाचा अजिबात वापर करू दिला नाही, त्यांना कंट्रोल ग्रुप संबोधण्यात आले. त्यानुसार 2016-17 शैक्षणिक वर्षात 3 री ते 5 वीच्या प्राथमिक स्तरावर ट्रीटमेंट ग्रुपमध्ये कंट्रोल ग्रुपपेक्षा इंग्रजीत 21 टक्क्यांनी सुधारणा दिसून आली. तर 6 वी व 7 वी इयत्तेत 20 टक्के सुधारणा झाल्याचे आढळले. यातून मल्टी सेन्सरी तंत्रज्ञान प्रवण वाचनाने इंग्रजी वाचन आणि आकलनात सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

इंग्लिश हेल्परचे एमडी व सीईओ संजय गुप्ता म्हणाले, अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली, तर विद्यार्थ्यांच्या वाचनात तातडीने सुधारणा होऊ शकते. गेल्या दोन वर्षांत 20 हजार विद्यार्थ्यांवरून 1 लाखांपर्यंत आम्ही पोहोचलो असून, याआघाडीवर 50 पटीने विकास होत आहे. डिजिटाईज शिक्षणामुळे 50 दशलक्ष विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन व आकलनातील समस्या सोडवता येतील.

तंत्रज्ञानातून साक्षरता वाढेल : डॉ. वेंकट श्रीनिवासन

इंग्लिश हेल्परचे संस्थापक व आकलनशास्त्रज्ञ डॉ. वेंकट श्रीनिवासन म्हणाले, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आकलन सुलभ होत असून, यातून आपण साक्षरतेच्या प्रश्नावरील उत्तर शोधू शकू. म्हणूनच्या मुलांच्या अध्यापन व जीवनावश्यक गरजांसाठी तंत्रज्ञानाचा आधार घेता येऊ शकतो. एकूणच तंत्रज्ञान प्रवणतेतून एकाच वेळी कौशल्यातील असमानता व गुणवत्तेचे प्रमाण यावर मात करता येईल.