|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत दूध टँकरच्या धडकेत एक ठार

मिरजेत दूध टँकरच्या धडकेत एक ठार 

प्रतिनिधी/ मिरज

शहरातील शास्त्राr चौकातील खड्डय़ाने एकाचा बळी घेतला आहे. शुक्रवारी रात्री खड्डा चुकविताना टँकर चालकाचा ताबा सूटून तो रस्त्याकडेला उभा असणाऱया नारायण रामचंद्र मेंगाणे (40, रा.कुंडल) याच्या अंगावर जाऊन तो जागीच ठार झाला. संतप्त जमावाने टँकरची तोडफोड केली आहे. टँकर चालक गंगाधर आवाड (वय 47, रा. गोठणखेडे, जि.अहमदनगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने शहरातील खड्डय़ांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

शहरातील शास्त्री चौक भागात कर्नाटक आणि महाराष्ट्राकडे जाणारे महत्वाचे मार्ग आहेत. मात्र याच चौकात या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. खड्डय़ांमुळे या मार्गावर वारंवार अपघात घडले आहेत. शुक्रवारी मात्र या खड्डय़ाने एका तरुणाचा बळी घेतला.

शुक्रवारी रात्री अहमदनगरहून दुधाचा टँकर (एमएच-12-एलटी-2395) हा शास्त्री चौक मार्गे म्हैसाळकडे निघाला होता. शास्त्री चौकात आल्यानंतर मध्यभागी पडलेला भलामोठा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात टँकर चालकाचा ताबा सुटून तो रस्त्याकडे उभा असणाऱया नारायण रामचंद्र मेंगाणे यांच्या अंगावर गेला. टँकरचे चाक मेंगाणे यांच्या अंगावरुन गेल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.

संतप्त नागरिकांनी टँकरची तोडफोड केली. टँकरच्या काचा फोडल्या. नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या भागातील खड्डे मुजविण्याची मागणी वारंवार केली असता, प्रशासनाने त्याकडे कोणतेच लक्ष दिले नाही. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. या अपघाताला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

टँकर चालक गंगाधर कारभारी आवाड (वय 47, रा.गोठणखेड, जि. अहमदनगर) हा पोलिसांत हजर झाला आहे. या घटनेने शहरातील रस्त्यावरील खड्डय़ांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱया वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. लहान-मोठे अपघात आजवर या मार्गावर घडले आहेत. शुक्रवारी याच खड्डय़ाने एकाचा बळी घेतला आहे. आतातरी महापालिका प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत.

Related posts: