|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बार्शीत गोवंशाची कातडी वाहतूक करणारा टेम्पो पकडला

बार्शीत गोवंशाची कातडी वाहतूक करणारा टेम्पो पकडला 

प्रतिनिधी/ बार्शी

बार्शी-परांडा रस्त्यावरून गाय व गोवंशाची कातडी वाहतूक करीत असलेल्या आयशर टेम्पोला बार्शी पोलिसांनी बाहय़वळण वस्तीवर पकडले असून सुमारे सहा लाख 25 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी तिघाजणांना अटक करून बार्शी न्यायालयात उभे केले असता 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱयांनी दिले.

अविस अब्दुलख सौदागर (मंगळवार पेठ बार्शी), युन्नूस हुसेन शेख (नीरावागज बारामती) ख्वॉजा सैफुल शेख (चालक रा. गुजवडी रोड बारामती) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. पोलीस हवालदार सचिन माने यांनी फिर्याद दाखल केली. शनिवारी पहाटे तीन वाजता हा टेम्पो पकडण्यात आला.

परांडा येथून बार्शीकडे गोमांस घेऊन जात असल्याची माहिती खबऱयाने सोलापूर पोलीस नियंत्रण कक्षेला रात्री बाराच्या सुमारास कळवली होती. पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी बार्शी पोलिसांना आदेश देऊन या मार्गावर सापळा रचून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्याचे आदेश दिले.

उपाधीक्षक व सध्याचे बार्शीचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप मिटके, उपनिरीक्षक संदीप जोरे यांच्यासह पोलीस पथकाने बाहय़वळण रस्त्यावर शनिवारी पहाटे तीन वाजता एमएच 13 एएक्स 4986 हा आयशर टेम्पो अडवला. त्यावेळी वाहनात गोमांस व गोवंशाची कातडी असल्याचे निदर्शनास आले.

हा टेम्पो सरळ बार्शी पोलीस ठाण्यात आणून त्याची तपासणी करण्यात आली. पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. धनंजय जगदाळे यावेळी पथकासोबत उपस्थित होते. टेम्पोमध्ये एकूण 308 गायींची कातडी तसेच गोवंश वासरांची 56 कातडी, अशी 364 कातडी होती. याची किंमत एक लाख 25 हजार असून टेम्पोची पाच लाख असा 6 लाख 25 हजाराचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

महाराष्ट्र प्राणी रक्षक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कातडी नेमकी कोठून आणली. गायींची हत्या कोठे झाली तसेच हा टेम्पो कोठे जात होता, याबाबत पोलीस तपास घेत असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप जोरे करीत आहेत.

Related posts: