|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तेजस्वी यादव यांच्या वादग्रस्ततेत वाढ

तेजस्वी यादव यांच्या वादग्रस्ततेत वाढ 

तरूणी आणि मद्याच्या बाटलीसोबत छायाचित्र

वृत्तसंस्था /  पाटणा

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी वादग्रस्त ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचे पुत्र यांचे एक छायाचित्र वादग्रस्त ठरत आहे. समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या या छायाचित्रात तेजस्वी यादव एक तरूणी आणि मद्याच्या बाटलीसोबत दिसत आहेत. यामुळे बिहार मधील सत्ताधारी पक्ष संयुक्त जनता दलाने त्यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

बिहारमध्ये मद्यबंदी असल्याने हे छायाचित्र वादग्रस्त ठरले आहे. तीनच दिवसांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी बिहार सरकार मद्यसम्राटांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. नितीशकुमार यांच्या संजदचे अनेक नेते आपल्या घरांमध्ये दारूच्या बाटल्या ठेवतात. मद्यबंदी केवळ सर्वसामान्य जनतेसाठी आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर हे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.

हे छायाचित्र जुने आहे, आरोप राजदने केला आहे. ते संजदनेच आमची बदनामी करण्यासाठी व्हायरल केले आहे, असाही आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे. पण संजदने त्याचा इन्कार केला. तेजस्वी यादव मद्यबंदी असतानाही मद्यप्राशन करतात. लालूंनी आपल्या पुत्राची रक्ततपासणी करून घ्यावी, असा खोचक सल्लाही संजदच्या प्रवक्त्यांनी दिला आहे. या वादात भाजपनेही उडी घेतली असून तेजस्वी यादय यांनी मतदारांना स्पष्टीकरण दिले पाहिजे असे आवाहन त्याने केले आहे. तेजस्वी यादव यांनी मात्र या अशा छायाचित्रात काहीच चूक नसल्याचे म्हटले.