|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अडकोण महिषासुरमर्दनीचा उद्या जत्रोत्सव

अडकोण महिषासुरमर्दनीचा उद्या जत्रोत्सव 

वार्ताहर /पणजी :

बाणस्तारी अडकोण येथील महिषासुरमर्दनी (श्री नवदुर्गा) देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार 18 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

अडकोण येथील नवदुर्गा देवीचा जत्रोत्सव म्हणजे जुन्या काळातील ‘गऱयांची जत्रा’ आणि तद्नंतर ‘रेडय़ाची जत्रा’ म्हणून गोव्यात प्रसिद्ध होती. गऱयांच्या जत्रेला गडय़ांच्या मानेला गरा (हूक) लावून ते राटय़ाला लोबंकळत असत, त्यानंतर तो राटा गरगरा फिरवला जायचा. ही प्रथा आता बंद पडली आहे. त्यानंतर पहाटे जीवंत रेडय़ाला बळी देण्याची प्रथा सुरू झाली. कालांतराने ही प्रथा सुद्धा बंद पडली आहे. सध्या या जत्रोत्सवात गावढी कोंबडय़ांचे बळी दिले जातात.

शनिवारी सकाळी 10 वाजता देवीस अभिषेक, दुपारी 12 वाजता दिवजोत्सव, आरती, तीर्थप्रसाद व रात्री 10 वाजता ॐ बालनाटय़ मंडळ मेरशी निर्मित ‘रुद्रप्रणयिनी’ हा पौराणिक संगीत नाटय़प्रयोग होईल. नाटकाचे लेखन घनःश्याम वेरेकर यांनी केले आहे तर दिग्दर्शन देविदास तारी यांचे आहे.