|Thursday, August 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हार्दिक पटेल गटाला झटका

हार्दिक पटेल गटाला झटका 

महत्त्वाचा सहकारी केतन पटेल भाजपमध्ये जाणार

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या हार्दिक पटेल याला स्वतःलाच मोठा दणका बसला. पाटीदार आंदोलनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा सहकारी केतन पटेलने हार्दिकची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पाटीदार आंदोलनातील अनेक सहकारी हार्दिकला सोडून जात असल्याने त्याचा प्रभाव कमी झाल्याचे मानले जाते.

मागील काही दिवसांमध्ये हार्दिकची साथ सोडणारा हा दुसरा पटेल नेता आहे. या अगोदर चिराग पटेलने भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर रेशमा पटेल आणि वरुण पटेल यांनी देखील हार्दिकच्या गटातून बाहेर पडणे पसंत करत भाजपची वाट धरली.

पाटीदार आंदोलनावेळी हार्दिक प्रमाणेच केतन पटेल याच्यावर देखील राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होता, परंतु नंतर केतन पटेल हा हार्दिक विरोधातील साक्षीदार झाला. केतन पटेल याचा भाजपप्रवेश हार्दिककरता मोठा धक्का असल्याचे राजकीय जाणकारांचे मानणे आहे.

हार्दिकने भाजपच्या विरोधात भूमिका घेतली असली तरीही निवडणूक जवळ येऊ लागल्याने त्याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. एकीकडे भाजपपासून त्याने अंतर राखले. तर दुसरीकडे काँग्रेससोबत होणारी त्याची बोलणी फिस्कटल्याचे सांगण्यात येते.

पाटीदारांना आरक्षण देण्याच्या प्रस्तावित सूत्राला अंतिम रुप देण्यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखालील पाटीदार अनामत आंदोलन समिती आणि काँग्रेस यांच्यात शुक्रवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. परंतु काँग्रेस नेत्यांनी मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पटेल नेत्यांनी केला. तसेच काँग्रेस पक्षाला निर्णय घेण्यासाठी 24 तासांची मुदत दिली. निर्धारित मुदतीत काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली नाही तर पाटीदार त्याच्या विरोधात उतरतील. भाजपच्या धर्तीवर काँग्रेसची गत करू असा इशारा पटेल नेत्यांनी दिला. काँग्रेससोबतची बोलणी यशस्वी न झाल्यास पाटीदार समुदाय अपक्ष उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत. तर हार्दिकने काँग्रेसबद्दल पटेल नेत्यांना चुकीची समजूत झाल्याचे वक्तव्य करत वेळ मारून नेली. परंतु काँग्रेससोबत पाटीदारांची आघाडी होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे.