|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दिगंबर कामत रविवारीही गायब

दिगंबर कामत रविवारीही गायब 

अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी

प्रतिनिधी/ पणजी

खाण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सोमवारी दुपारी पणजी सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. जामीन अर्ज नामंजूर झाल्यास दिगंबर कामत यांना अटक अटळ आहे. जामीन अर्ज नामंजूर होण्यासाठी पोलीस पूर्ण तयारी करीत आहे. अटकपूर्व जामीनावर सुनावणी सुरु करण्याअगोदर कामत यांनी न्यायालयात हजर रहावे, अशी मागणी पोलीस न्यायालयाकडे करणार, असे पोलीससूत्रांनी सांगितले.

खाण घोटाळय़ामुळे अडचणीत आलेले काँग्रेसनेते तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना एसआयटीकडून अटक होण्याची शक्यता असल्याने ते गोव्याबाहेर गेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारनंतर काल रविवारी दिवसभर त्यांचा मडगावातील फ्लॅट व बंगला बंद होता. या प्रकाराने त्यांचे कार्यकर्ते गोंधळून गेले असून सरकार कामत यांच्यावर सूड उगवित असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सप्टेंबर 2014 साली माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या विरोधात प्रफुल्ल हेदे यांच्या खाण लिजचे बेकायदेशीररित्या नुतनीकरण करण्यास मान्यता दिल्या प्रकरणी एसआयटीने गुन्हा नोंद केला होता.

अटकेच्या भीतीने कामतांची न्यायालयात धाव

त्यासंदर्भात शनिवारी 18 रोजी प्रफुल्ल हेदे यांना चौकशीसाठी बोलविले होते. मात्र त्यांची तब्येत ठिक नसल्याने ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. मंगळवार 21 रोजी कामत यांना एसआयटीने चौकशीसाठी बोलविले असता त्यांनी अटक होण्याच्या भीतीने येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.

एम. बी. शहा आयोगाने दिलेल्या अहवालानुसार राज्यात मोठय़ा प्रमाणात खाण घोटाळा झाला आहे. अनेक खाणींच्या लिजांचे बेकायदेशीररित्या नुतनीकरण करण्यात आल्याने सरकारचा कोटय़वधी रुयांचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणात खाण मालक प्रफुल्ल हेदे तसेच इतर अनेक सरकरी अधिकाऱयांविरोधातही तक्रारी नोंद करण्यात आल्या आहेत.

एसआयटीच्या तपासाला आला वेग

गेल्या काही दिवसांपासून एसआयटीच्या तपास कामाला बराच वेग आला असून खाण खात्याचे माजी मुख्य सचिव राजीव यदुवंशी यांची कसून चौकशी केल्यानंतर एसआयटीच्या हाती बरेच पुरावे लागले आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत पूर्ण अडचणीत आले आहे. दिगंबर कामत यांना अटक करण्याची पोलिसांनी पूर्ण तयारी केली आहे. शनिवारी कामत यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेले होते. रात्री उशिरापर्यंत पोलीस मडगावात ठाण मांडून होते. मात्र कामत यांनी पोबारा केल्याने ते पोलिसांना सापडले नाहीत. पोलिसांनी त्यांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे फोन बंद असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

खाण घोटाळा प्रकरणात एसआयटीने खाण खात्याचे माजी मुख्य सचिव राजीव यदुवंशी यांच्यासह अनेक खाण खात्यातील अधिकाऱयांच्या जबान्या नोंद करून घेतल्या आहेत. राजीव यदुवंशी यांची 164 कलमाखाली जबानी नोंद करून घेतली असून त्यात यदुवंशी यांनी दिगंबर कामत हेच दोषी असून त्यांनी खाण लिजांचे बेकायदेशीररित्या नुतनीकरण करण्यास सांगितले होते असे एसआयटीसमोर उघड केले आहे. तेव्हापासून एसआयटी दिगंबर कामत यांच्या मागावर आहे.