|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » विश्वासार्हतेत मोदी सरकार तिसऱया स्थानी

विश्वासार्हतेत मोदी सरकार तिसऱया स्थानी 

जागतिक संस्थेच्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष : 74 टक्के भारतीय जनतेचा केंद्र सरकारवर विश्वास

वृत्तसंस्था/  नवी दिल्ली

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार जगातील सर्वाधिक विश्वासार्ह सरकारांपैकी एक आहे. ऑर्गनायजेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (ओईसीडी) च्या सर्वेक्षणानुसार मोदी सरकार विश्वासार्हतेत जगात तिसऱया स्थानावर आहे. अलिकडेच प्यू या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात भारतीय जनतेने नरेंद्र मोदींनाच सर्वाधिक पसंती दर्शविली होती. त्यानंतर मूडीजने भारतीय अर्थव्यवस्थेच्या पतमानांकनात वाढ केल्याने मोदी सरकारच्या कामकाजाला एकप्रकारे जागतिक मान्यता मिळाली.

तीन चतुर्थांश भारतीयांनी मोदी सरकारवर विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील तिसऱया क्रमांकाच्या सर्वाधिक विश्वासार्ह सरकारचे नेतृत्व करत असल्याचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने या अहवालाचा उल्लेख करत म्हटले.  भारतात अलिकडेच झालेल्या भ्रष्टाचारविरोधी तसेच कर सुधारणांमुळे सरकारविषयीचा विश्वास वाढल्याचे वक्तव्य फोरमने केले.

जवळपास 74 टक्के भारतीयांनी मोदी सरकारवर विश्वास असल्याचे नमूद केले. केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी ओईसीडी अहवाल ट्विटद्वारे मांडला. काही वर्षांअगोदर नागरिकांनी सरकार तसेच राजकीय नेत्यांवरील विश्वास गमाविला होता. योग्य धोरणे आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने हा विश्वास पुन्हा संपादित केला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक भारतीयाला नवभारत दिसू लागल्याचे नड्डा यांनी ट्विट करत म्हटले.

केंद्र सरकारवर तीन चतुर्थांश भारतीयांचा विश्वास असल्याचे अहवालातून समोर आले. सर्वेक्षणात सर्वाधिक विश्वासार्हता असण्याचा मान स्वीत्झर्लंडने मिळविला असून त्यानंतर इंडोनेशियाने क्रमांक पटकाविला.

भारतातील विद्यमान सरकारने तिसरे स्थान मिळविले. सरकारवर विश्वास आहे की नाही याचा निर्णय घेण्यास अर्थव्यवस्थेची स्थिती, राजकीय उलथापालथ आणि महत्त्वाचे कार्यक्रम या बाबी कारणीभूत ठरल्या.

जनतेचा सर्वाधिक विश्वास गमाविणाऱया देशांमध्ये चीन, फिनलंड, ग्रीस आणि स्लोव्हेनिया यांचा समावेश आहे. जनतेचा विश्वास पुन्हा संपादित करण्यासाठी सरकारला अधिक परिश्रम करावे लागतील असे ओईसीडीने सांगितले. सार्वजनिक सेवेत अधिक पैसा ओतावा लागेल आणि संपूर्ण लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पावले उचलावी लागतील. यात आरोग्यसेवा, रोजगार आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये भर द्यावा लागेल असे अहवालात म्हटले गेले.

जून महिन्यातील ओईसीडीच्या सर्वेक्षणात देखील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वाधिक विश्वासार्ह सरकारमध्ये तिसरा क्रमांक पटकाविला होता. त्यावेळी मोदी सरकारवर 73 टक्के भारतीयांनी विश्वास व्यक्त केला होता.

 

 

Related posts: