|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कुवारबाव येथे महामार्ग भूसंपादन बंद पाडले

कुवारबाव येथे महामार्ग भूसंपादन बंद पाडले 

रत्नागिरी मिऱया-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण

कुवारबाव व्यापारी संघाच्या मागणीविरोधात कार्यवाही

आज कुवारबाव बंद, अधिकाऱयांच्या उपस्थितीत होणार मोजणी

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी मिऱया-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी शहरानजीकच्या कुवारबाव येथे होत असलेले भूसंपादन प्रशासन येथील व्यापारी व ग्रामस्थांवर लादत असल्याचे म्हणणे आहे. त्यासाठी बुधवारी व्यापारी संघाने या ठिकाणी सुरू झालेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवला. 30 मीटरची मागणी असताना प्रशासन 45 मीटर रुंदीकरण करण्याची भूमिका घेत आहे. त्यासाठी गुरूवारी संपूर्ण कुवारबाव बाजारपेठ पुन्हा एकदा बंद ठेवून या ठिकाणी ‘रास्ता रोको’ करण्याचा, इशारा कार्याध्यक्ष नीलेश लाड यांनी दिला आहे.

रत्नागिरीतील मिऱया ते नागपूर अशा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण शासनस्तरावरून होणार आहे. या रुंदीकरणामुळे साळवी स्टॉप ते हातखंबा दरम्यानच्या मार्गालगतचे व्यापारी, दुकानदार या महामार्गाच्या रुंदीकरणामुळे लगतचे अनेक व्यावसायिक, कुटुंबे बाधित होणार आहेत. त्यासाठी कुवारबाव व्यापारी संघाच्यावतीने मंगळवारी साळवी टॉप-कुवारबाव-खेडशी-पानवल दरम्यानच्या मार्गावरील सर्व दुकाने गेल्या ऑक्टोबर महिन्यात बंद ठेवली होती. यामध्ये 740 दुकानदार, व्यापारी सहभागी होते. बंददरम्यान सकाळी कुवारबाव येथे मोठय़ा संख्येने व्यापारी, दुकानदार शासनाच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरले होते.

महामार्ग रुंदीकरणाविरोधात कुवारबाव येथे काही काळ रास्ता-रोको करण्यात आला. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र हा रास्ता-रोको शासनाला इशारा देण्यासाठी असल्याने व्यापारी, दुकानदार यांनी महामार्ग रुंदीकरणाविरोधात जोरदार निदर्शने केली होती. त्यानंतर कुवारबाव बाजारपेठेतून सर्व व्यापारी व दुकानदार यांनी घोषणाबाजी करत जनजागृती रॅली काढली.

शासनाने येथील व्यापाऱयांचा प्रकर्षाने विचार करून या महामार्गाचे रुंदीकरण करावे. जेणेकरून महामार्गालगतचे व्यापारी, दुकानदार यांना मोलाचा दिलासा मिळेल. महामार्गाचे रुंदीकरण हे फक्त 30 मीटरचे करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आहे. जेणेकरून येथील कोणत्याही व्यापारी वा दुकानदारांनाही त्याची मोठी बाधा होण्याचा संभव नाही. या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा कुवारबाव येथे भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली. त्यावेळी ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासन यंत्रणेमार्फत 45 मीटरच्या रुंदीकरणासाठी मोजणी सुरू होती. त्याला व्यापारी संघाने आक्षेप घेतला.

पोलीस संरक्षणात ही मोजणी सुरू होती. या प्रकियेदरम्यान व्यापारी संघटनेने 30 मीटर रुंदीकरणाची मागणी सुरूवातीपासून लावून धरली आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये, असे उपस्थित यंत्रणेला ठासून सांगण्यात आले. व्यापारी संघाची मागणी व भूमिका लक्षात घेता भूसंपादन प्रकियेवर यंत्रणेने सुरूवातीला होकार दर्शवला. मात्र थोडय़ावेळाने भूमिका बदलून 45 मीटरची मोजणीला यंत्रणेने कार्यवाही सुरू केली. त्यामुळे व्यापारी संघाने ताठर भूमिका घेत ही मोजणी प्रक्रिया बंद पाडली. प्रशासन व्यापाऱयांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. कुवारबाव येथे 30 मीटरचेच रुंदीकरण करण्यात यावे, अशा मागणीवर व्यापारी ठाम राहिले आहेत.

आज कुवारबाव बाजारपेठ राहणार बंद

व्यापाऱयांचा होत असलेला विरोध लक्षात घेता गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा प्रशासनातील अधिकाऱयांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यावेळी व्यापाऱयांशी चर्चा होणार आहे. प्रशासनाच्या भूमिकेबाबत व्यापारी संघटनेकडून कुवारबाव बाजारपेठ 23 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार असल्याचे लाड यांनी सांगितले. प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास येथे ‘रास्ता रोको’ करण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष नीलेश लाड, यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष सुनील साळवी, माजी सरपंच राजू तोडणकर यांच्यासह व्यापारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.