|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत मोकाट कुत्र्यांनी बालकांचे लचके तोडले

मिरजेत मोकाट कुत्र्यांनी बालकांचे लचके तोडले 

प्रतिनिधी /मिरज :

भटक्या कुत्र्यांनी गुरूवारी शहरातील शास्त्री चौक, साठेनगर, पवार गल्ली, उत्तमनगर आणि नदीवेस भागातील सहा ते सात जणांचे लचके तोडले. यामध्ये चार बालकांचा समावेश आहे. मनपा अधिकाऱयांना कळवूनही कोणीही घटनास्थळी दाखल न झाल्याने संतप्त नागरिकांनी कुत्र्याला ठार मारुन त्याचा मृतदेह आरोग्याधिकारी डॉ. सुनील ताटे यांच्या कार्यालयात टेबलवर आणून टाकला. आरोग्य विभागाच्या या कारभाराविरोधात सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी तानाजी रुईकर यांनी दिला.

भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेल्यांमध्ये अथर्व भोरे (वय 2 वर्षे, रा. अण्णाभाऊ साठेनगर, शास्त्री चौक), अभिषेक सुभाष गोसावी (वय 12, रा. गोसावी गल्ली), सागर चन्नाप्पा कांबळे (वय 4, रा. उत्तमनगर), मोहंमद छोटू शेख (वय 15, रा.कोल्हापूर चाळ, झोपडपट्टी) आणि यश राजेंद्र भोसले (वय 6, रा. पवार गल्ली) या लहान बालकांसह अनेकांचा जखमींमध्ये समावेश आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आज सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान या भटक्या कुत्र्यांनी शास्त्री चौक, साठेनगर, पवार गल्ली, उत्तमनगर, नदीवेस या भागात घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या लहान बालकांचा चावा घेतला. याचवेळी पळून जात असलेल्या काही तरुणांचेही या कुत्र्यांनी लचके तोडले. त्यामुळे जखमींची संख्या जास्त असण्याची शक्यता आहे. कुत्र्यांनी भोरे या मुलाच्या कानाचा चावा घेऊन कान तोडला आहे.  तर काही बालकांना पायाला, मांडीला, हाताला आणि पोटाला चावा घेऊन जखमी केले आहे. तर काही तरुणांच्या पायाचे लचके कुत्र्यांनी तोडले आहेत. या प्रकारामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Related posts: