|Sunday, December 8, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीतील लिंगायत महामोर्चाला 5 लाख समाज बांधव येणार

सांगलीतील लिंगायत महामोर्चाला 5 लाख समाज बांधव येणार 

प्रतिनिधी/ सांगली

धर्म मान्यतेसह अन्य मागण्यांसाठी रविवार 3 डिसेंबर रोजी सांगलीमध्ये काढण्यात येणाऱया लिंगायत समाजाच्या महामोर्चास पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकातील बेळगाव, विजापूर या जिह्यातून सुमारे 5 लाखहून अधिक समाजबांधव येतील. मोर्चा अभूतपूर्व असा असेल, असा आत्मविश्वास अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या पदाधिकाऱयांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. महामोर्चाचे सर्व नियोजन पूर्ण झाले असून सांगलीतील विश्रामबाग चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा महामोर्चाचा मार्ग असेल, असेही पदाधिकाऱयांनी यावेळी स्पष्ट केले.

विश्वनाथ मिरजकर म्हणाले, सांगलीत होणाऱया महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात जनजागृती केली आहे. गावागावात बैठका, सभा, मोटारसायकल रॅली काढून समाज बांधवांच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्याचे काम केले आहे. या मोर्चास जवळपास 5 लाखाहून अधिक लोक येतील, असा आत्मविश्वास व्यक्त करत मिरजकर म्हणाले, मराठा क्रांती मोर्चाचा आदर्श डोळयासमोर ठेऊन अत्यंत शिस्तबध्द पघ्दतीने हा महामोर्चा काढण्यात येणार आहे.

10 ठिकाणी पार्किंग व्यवस्था

लिंगायत बोर्डिंगचे सुधीर सिंहासने म्हणाले, महामोर्चाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख व मनपा आयुक्त यांच्याशी बैठका घेतल्या आहेत. मनपाने बॅरेकेट्स तसेच स्वच्छतेची हमी दिली आहे. पार्किंगची ठिकाणे निश्चीत करण्यात आली आहेत. कर्नाटक व मिरज पूर्व भागातून येणाऱया वाहनांसाठी सांगली-मिरज मार्गावरील संजय भोकरे इन्स्टिटय़ूटचे मैदान, चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, विलिंग्डन महाविद्यालय व वालचंद कॉलेजच्या मैदानावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कोल्हापूरहून येणाऱया वाहनांसाठी नेमीनाथनगर मधील मैदान व शंभर फूटी रस्त्याची एक बाजू, इस्लामपूर-शिराळाकडून येणाऱया वाहनांसाठी आंबेडकर स्टेडियम, तासगाव-पलूसकडून येणाऱया वाहनांसाठी सह्याद्रीनगर येथील 80 फूटी रोड व मार्केट यार्ड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोर्चासाठी 50 ते 60 जगद्गुरु येणार

महामोर्चासाठी समाजातील 50 ते 60 हून अधिक जगद्गुरु उपस्थित राहणार असल्याचे सांगत प्रदीप वाले म्हणाले, डॉ. शिवलींग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. 102 वर्षाचे असलेले डॉ. शिवलींग शिवाचार्य महाराजांनी प्रत्येक मोर्चाचे नेतृत्व केले आहे. याशिवाय माता महादेवी, कोरणेश्वर आप्पा स्वामिजी हेही मोर्चात सहभागी होणार आहेत. महामोर्चास सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत प्रदीप वाले म्हणाले, मराठा मोर्चाचा आदर्श डोळयासमोर ठेवून मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. रविंद्र केंपवाडे म्हणाले, मोर्चासाठी येणाऱया समाज बांधवांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. प्लॅस्टिकचा वापर करु नये. घाण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शिस्त मोडू नये. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. यावेळी संजीव पट्टणशेट्टी, डी. के. चौगुले, सुशील हडदरे यांच्यासह समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

अडीच लाख लोकांची नास्त्याची सोय

मोर्चासाठी येणाऱया लिंगायत समाजबांधवांसाठी मिरज मध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱया समाजातील डॉक्टरांनी चहा, नाश्त्याची सोय केली आहे. सुमारे अडीच लाख लोकांची सोय डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. केमिस्ट असोसिएशननेही स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली आहे. 1 हजार हून अधिक स्वयंसेवक केमिस्ट असोसिएशनचे असतील. महिलांसाठी खास महिला स्वयंसेवक असणार आहेत असे सांगत सिंहासने म्हणाले, महामोर्चासाठी सर्व पक्षीय सर्व संघटनांनी पाठींबा दिला आहे. मोर्चात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे.

Related posts: