|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वीज कंपनीचे 30 हजाराचे साहित्य चोरीला

वीज कंपनीचे 30 हजाराचे साहित्य चोरीला 

सावंतवाडी:

माजगाव-सातजांभळीजवळील जंगलमय परिसरातील वीज वितरण कंपनीचे जमिनीत उभे केलेले लोखंडी खांब व वायर असे सुमारे तीस हजार रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरटय़ाने चोरून नेले. याबाबतची तक्रार सावंतवाडी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता विवेक मसराम यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात चोरटय़ाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजगाव-सातजांभळ नजीक सुरेश कासार यांच्या घराजवळील जंगलमय भागात वीज वितरण कंपनीची वीज वाहिनी जोडण्यात आली होती. ती कित्येक महिने बंद ठेवण्यात आली होती. या वीज वाहिनीचे चार जुने लोखंडी आठ मीटर लांबीचे खांब (12 हजार रुपये), 960 मीटर वायर (12 हजार रुपये) तसेच खांबावरील अन्य साहित्य (सहा हजार रुपये) असे 30 हजार रुपये किमतीचे साहित्य ऑगस्ट ते डिसेंबर 2017 या पाच महिन्यात अज्ञात चोरटय़ाने चोरी केल्याचे वीज कर्मचारी संदीप फुले व सचिन नाईक यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी सहाय्यक अभियंता मसराम यांना माहिती दिली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर मसराम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.