|Thursday, September 19, 2019
You are here: Home » क्रिडा » सेरेनाचे पुनरागमन लवकरच

सेरेनाचे पुनरागमन लवकरच 

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन :

पुढील महिन्यात मेलबोर्न येथे होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत अमेरिकेची ‘सुपरमॉम’ महिला टेनिसपटू आणि माजी टॉप सीडेड सेरेना विल्यम्सचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या स्पर्धेत आपण निश्चितपणे सहभागी होणार असल्याचे सेरेनाने ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेच्या आयोजकांना कळविले आहे.

सेरेनाने 2017 सालातील ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे जेतेपद मिळविले आहे. त्यानंतर गेल्या सप्टेंबरमध्ये तिने आपल्या पहिल्या अपत्याला (मुलगी) जन्म दिला. 23 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविणारी सेरेना पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद स्वत:कडे राखण्यासाठी सहभागी होणार असल्याचे स्पर्धा संचालक क्रेग टिले यांनी सांगितले. सेरेनाने आतापर्यंत सातवेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेसाठी सेरेनाला व्हिसा मिळाला असून तिने आपल्या सरावाला यापूर्वीच प्रारंभ केला आहे.  2018 सालातील ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम विजेत्याला 40 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी एकूण बक्षीस रकमेत 10 टक्यांनी वाढ केली आहे. सेरेना यावेळी ही स्पर्धा जिंकून विक्रमी 24 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदाचा विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न करेल.